घाटकोपर इमारत दुर्घटना : अहवालात अधिका-यांना अभय, विरोधकांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 02:06 AM2017-08-27T02:06:56+5:302017-08-27T02:06:59+5:30
घाटकोपर येथील सिद्धिसाई इमारत दुर्घटनेस शिवसेनेचा कार्यकर्ता सुनील शितप जबाबदार असल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे.
मुंबई : घाटकोपर येथील सिद्धिसाई इमारत दुर्घटनेस शिवसेनेचा कार्यकर्ता सुनील शितप जबाबदार असल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. मात्र, या चौकशीत पालिका अधिकाºयांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलो. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
घाटकोपर येथील चारमजली सिद्धिसाई इमारत २५ जुलैला कोसळून १७ जण मरण पावले, तर १५ जखमी झाले होते. इमारत दुर्घटनेचा अहवाल पालिका आयुक्तांना नुकताच सादर करण्यात आला. यात सेनेचा स्थानिक नेता शितप याच्यावर ठपका आहे. मात्र, एन विभागाचे तत्कालीन वैद्यकीय आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांचा या घटनेशी थेट संबंध नाही, असे नमूद करून अधिकाºयांचा बचाव केल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
पालिका अधिकाºयांच्या संगनमतानेच या इमारतीत बेकायदेशीर बांधकाम सुरू होते. त्यामुळे प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करून त्याचा अहवाल एका महिन्यात सादर करावा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याचे या प्रकरणी अधिक माहिती देताना विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.
अहवाल काय सांगतो ?
- तळमजल्यावरील सर्व भिंती हटविण्यासह खांब व काँक्रीटचे आवरण हटविल्यामुळे इमारत असुरक्षित झाली होती.
-इमारत कमकुवत नव्हती, तर शितप यांनी खांब काढल्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत होऊन ही दुर्घटना घडली.
-शास्त्रीय पद्धतीची अंमलबजावणी न करता, नूतनीकरणाचे काम करण्यात आले होते.
- या दुर्घटनेस व जीवितहानीला या इमारतीमध्ये बदल करणारी व्यक्तीच जबाबदार आहे. त्यामुळे संबंधित कायद्यातील कलमान्वये कारवाई करावी.