मुंबई : घाटकोपरच्या गारोडीया नगरात काल दिवसाढवळया घरफोडी झाली. चोरट्यांनी येथील सुदर्मा इमारतीतील साल्वाडोर मोशाईच (वय ४६) यांच्या बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून तब्बल दहा लाखांचे दागिने चोरले. मोशाईच एलआयसीत फिल्ड आॅफिसर असल्याचे पंतनगर पोलिसांनी सांगितले. मोशाईच कुटुंबिय काल घर बंद करून बाहेर पडले होते. त्यांचे घर चोरटयांनी लक्ष्य केले. मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि मोशाईच यांचे तब्बल ४१ तोळे सोन्याचे दागिने, पाच हजार रुपयांची रोकड चोरून नेली. गुन्हा घडल्यानंतर सुदर्मा इमारतीत पोहोचलेल्या पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. मुळात गारोडीया नगर हा घाटकोपर पूर्वेकडील पॉश इलाखा आहे. तसेच सुदर्मा इमारतीतही श्रीमंत कुटुंबे आहेत. असे असून या इमारतीला साधा वॉचमनही नाही, सीसीटीव्ही यंत्रणा तर लांबची गोष्ट, असे एका अधिकार्याने सांगितले. तूर्तास या इमारतीच्या शेजारील इमारतींचे, दुकानांचे सीसीटीव्ही चित्रण तपासण्याचे काम पंतनगर पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)
घाटकोपरमध्ये भरदिवसा १० लाखांची घरफोडी
By admin | Published: May 24, 2014 1:58 AM