Join us

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 6:54 AM

होर्डिंग्ज बसवण्यासंबंधीची आर्थिक बाबही तपासाधीन असल्याचे सांगत पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घाटकोपर परिसरात होर्डिंग कोसळून १७ जणांचा बळी घेणाऱ्या इगो प्रायव्हेट लिमिटेड या जाहिरात फर्मचा संचालक भावेश भिंडे याच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने रविवारी २९ मेपर्यंत वाढ केली. कंपनीने शहरभर लावलेल्या इतर होर्डिंग्जचीही चौकशी तसेच होर्डिंग्ज बसवण्यासंबंधीची आर्थिक बाबही तपासाधीन असल्याचे सांगत पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने कोठडीत वाढ केली आहे. 

होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी भिंडेला १६ मे रोजी उदयपूर येथून अटक केली. तो २६ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत होता. कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. ही मुदत संपल्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. भिंडे  इगो मीडिया या कंपनीचा संचालक होण्यापूर्वी घाटकोपर येथील जाहिरात फलकाचे कंत्राट या कंपनीला मिळाले होते. पण त्यापूर्वीपासूनच या कंपनीतून दर महिन्याला ठराविक रक्कम आरोपीच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा होत होती. आरोपी भिंडे हा स्वतः काळ्या यादीत असल्यामुळे परिचित व्यक्ती व नोकरांना कंपनीचे संचालक बनवून कंत्राट मिळवत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

१०० वेळा ठोठावला होता दंड

भिंडे १९९८ सालापासून या व्यवसायात असून, त्याला आतापर्यंत १०० हून अधिक वेळा महापालिकेने दंड ठोठावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :घाटकोपरअटकमुंबई पोलीसन्यायालय