मुंबईतघाटकोपर येथील महाकाय होर्डिंग दुर्गटनेतील मुख्य आरोपी आणि इगो मीडिया जाहिरात कंपनीचा मालक भावेश भिंडे याने जामिनासाठी दाखल केलेली याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. भावेश याला झालेली अटक कायदेशीरच असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
भावेशची अटक बेकायदेशीर असून तातडीने जामिनावर सुटका करण्यात यावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली. भिंडे याला अटक करताना योग्य कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली. ती बेकायदा असल्याचे किंवा त्यात काही त्रुटी असल्याचे आम्हाला आढळून आलेले नाही. त्यामुळे, आपल्याला बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात ठेवल्याचा भिंडे याचा आरोप चुकीचा आहे, अशी टिप्पणी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने केली. खंडपीठाने भिंडे याच्या याचिकेवर बुधवारी सविस्तर सुनावणी घेतली होती. त्यानंतर आज याचिकेवर निकाल दिला आहे.
होर्डिंग दुर्घटना हे दैवी कृत्य होते. त्यासाठी आपल्याला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असा दावा करून भिंडे याने याआधी जामिनाची मागणी केली होती. त्यानंतर, त्याने आपल्याला बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आले असा दावा करत अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला. पोलिसांनी मला १७ मे रोजी अटक केल्याचे दाखविले आहे. वास्तविक, त्यांनी १६ मे रोजी राजस्थानमधील उदयपूर येथून अटक केली आणि अहमदाबादमार्गे मुंबईत आणले. त्यामुळे मला केलेली अटक बेकायदेशीर आहे, असा दावा भावेशच्या वकिलांकडून करण्यात आला होता.
पोलिसांनी भिंडेचा हा दावा फेटाळत कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच भिंडेला अटक केल्याचे न्या. भारती डांग्रे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाला सांगितले.