घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी सहायक आयुक्त शहाजी निकम यांची गुन्हे शाखेकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 09:46 AM2024-05-29T09:46:24+5:302024-05-29T09:59:34+5:30
तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांना चौकशीसाठी बोलावणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने मंगळवारी तत्कालीन रेल्वे पोलिसांच्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त शहाजी निकम यांची चौकशी करत जबाब नोंदविला आहे. इगो प्रायव्हेट लिमिटेड संबंधित महत्त्वपूर्ण कागदपत्रे, परवानग्या याबाबतची माहिती घेण्यात आली. त्यापाठोपाठ लवकरच तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
घाटकोपरच्या छेडानगरमधील होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून घडलेल्या दुर्घटनेत १७ निष्पापांचा बळी गेला असून, ८० हून अधिकजण जखमी झाले. पंतनगर पोलिसांनी होर्डिंगचे भाडेपट्ट्यावर कंत्राट मिळालेल्या इगो मीडिया प्रा. लि. संचालक भावेश भिंडे याच्यासह अन्य संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक (एसआयटी) याचा तपास करीत आहे.
गुन्हे शाखेने याप्रकरणी भिंडेला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २९ मेपर्यंत कोठडी सुनावली आहे. बुधवारी भिंडेची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. होर्डिंग परवानगी प्रक्रियेबाबत अधिक चौकशी करण्यासाठी तत्कालीन रेल्वे पोलिसांच्या प्रशासन विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शहाजी निकम यांना गुन्हे शाखेने मंगळवारी चौकशीला बोलावले. त्यानुसार, दुपारच्या सुमारास निकम हे कागदपत्रांसह एसआयटी समोर हजर झाले.
कागदपत्रेदेखील सादर केली
इगो प्रायव्हेट लिमिटेडला दिलेल्या विविध परवानग्यांवर त्यांची सही आहे. तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्याच आदेशाने परवानगी दिल्याचेही त्यांनी एसआयटीला सांगितल्याचे समजते आहे. काही कागदपत्रेदेखील सादर केली आहेत. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे लवकरच कैसर खालिद यांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. निकम यांच्या चौकशीतून काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एसआयटीकडून अधिक चौकशी सुरू
गुन्हे शाखेच्या पथकाने होर्डिंगच्या परवानगीबाबत केलेल्या तपासात कैसर खालिद यांच्या बदलीचे आदेश १६ डिसेंबर २०२२ रोजी जारी करण्यात आले. त्याचवेळी भिंडे यांच्या कंपनीने होर्डिंगच्या परवानगीसाठी अर्ज दिला होता.
बदली आदेश निघाल्यानंतर खालिद यांनी सुटीच्या दिवशी, म्हणजेच रविवार, १८ डिसेंबर २०२२ रोजी होर्डिंगला परवानगी देण्याच्या फाइलवर सही केली. दुसऱ्या दिवशी होर्डिंगला परवानगी दिल्याचे आदेश जारी करण्यात आले.
खालिद यांनी सोमवारी रेल्वे पोलिस आयुक्त पदाचा पदभार डॉ. रवींद्र शिसवे यांच्याकडे सोपविल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले. त्यानुसार, एसआयटीकडून अधिक चौकशी सुरू आहे.