मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखालून 'अहो, माझा हात अडकलाय...', 'मी इथे फसलोय... मला वाचवा', यासह असंख्य फोनची खणखण नातेवाइक, मित्रमंडळींकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जवानांनी अथक प्रयत्न करत अनेकांचे जीव वाचवले, काही जणांची खणखण कायमची बंद झाली. दुसऱ्या दिवशी कुठे हंबरडा, तर कुठे जीव मुठीत धरून बचाव कार्य सुरू होते.
सायंकाळपासून गॅस कटरवर पाण्याचा मारा करत लोखंडी शेड कापणे सुरू करण्यात आले आहे. आणखीन तीन दिवस तरी हे संपूर्ण सांगाडा बाहेर काढण्यास लागेल असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. वाहनांवर पडलेला होर्डिंगचा लोखंडी सांगाडा... त्याखाली चुराडा झालेली वाहने... रस्त्यावरून जाताना ते पाहण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी... असे काहीसे चित्र घटनेच्या दुसऱ्या दिवशीही कायम होते.
दुसरीकडे सीएनजी, पेट्रोलमुळे गॅस कटरचा वापर न करता सांगाडा हटविण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे. कुठे जरासा स्पार्क झाला तर गॅस आणि पेट्रोलचा भडका होण्याची भीती आहे. त्यामुळे यंत्रणा सावध पावले उचलताना दिसली. कोसळलेला जाहिरात फलक, परांचीने संपूर्ण पेट्रोल पंप व्यापल्याने त्यातला नेमका भाग अलगद उचलण्यासाठी क्रेन, पोकलेन, जेसीबी आदी यंत्रांची मदत घेत दुसऱ्या दिवशी काम सुरू होते.
कोसळलेले फलक, परांची अनेक ठिकाणी तुटल्याने यंत्रे असूनही बचावकार्यात अडथळे येत होते. जाहिरातीचा कागद चिकटविण्यासाठी पत्रा, त्याला जोडणारी पोलादी परांचीचा सांगाडा याचे वजन हजारो टन असते. त्यामुळे हा सांगाडा कोसळल्यानंतर रिक्षा, टॅक्सी, कार, दुचाकी आदी वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. सेन्सरच्या मदतीने कोणी अडकले आहे का? याचा शोध यंत्रणेने घेतला. मात्र, कोणी आढळून आले नाहीत.
घटनास्थळी असलेल्या एका जवानाने सांगितले की, रात्री उशिरापर्यंत एक व्यक्ती फोन करून आत फसल्याचे सांगत होता. बराच वेळ शोध घेतला. मात्र, तो मिळाला नाही. त्यानंतर फोनही बंद झाला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना रात्री बाहेर काढण्यात येत होते. पहाटेपर्यंत १० जखमींना बाहेर काढले. त्यापैकी पाच जण मृत होते.