Join us

अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 6:17 AM

होर्डिंग्ज कोसळून १६ जण ठार झाले. या दुर्घटनेला जबाबदार धरत भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घाटकोपर होर्डिंग्ज दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी राजस्थानातील उदयपूर येथून गुरुवारी अटक केली. तो सतत लोकेशन बदलत असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पोलिसांना अडचणी येत होत्या. अखेरीस भावेशला एका रिसॉर्टवरून अटक करण्यात यश आले. दरम्यान, घटनेच्या ६० तासांनंतर बचावकार्य थांबविण्यात आले. महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. 

शुक्रवारी पहाटे साडेचारपर्यंत त्याला विमानाने मुंबईत  आणले जाईल, असे गुन्हे शाखेने सांगितले. होर्डिंग्ज कोसळून १६ जण ठार झाले. या दुर्घटनेला जबाबदार धरत भावेश भिंडेविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्याच्या मुलुंड येथील घराकडे धाव घेतली. मात्र, त्याने पोलिसांना गुंगारा दिला. मोबाइल बंद करून तो ठिकाण बदलत होता. लोणावळ्यातून तो राजस्थानला गेल्याची माहिती मिळताच पथक उदयपूरला रवाना झाले हाेते. 

भावेश भिंडे आहे तरी कोण? 

मुलुंडचा निवासी असलेला भावेश आधी गुज्जू ॲड ही कंपनी चालवत होता. मात्र, कंपनी काळ्या यादीत गेल्याने त्याने इगो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. भिंडेविरुद्ध जानेवारीत मुलुंड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. 

पेट्रोल पंपाचीदेखील तपासणी होणार

मुंबईत कोणत्याही व्यवसायासाठी पालिकेचा विहित परवाना आवश्यक आहे. त्यानुसार घटनास्थळावर असलेल्या पेट्रोलपंपाच्या बांधकामासाठीदेखील प्रोव्हिजिनल (तत्त्वतः) परवाना देण्यात आला होता. पेट्रोलपंप चालविण्याचा विहित परवाना संबंधितांनी प्राप्त केलेला होता की नाही, आदी बाबतची महापालिका प्रशासनाकडून तपासणी होणार आहे. 

शरद पवारांच्या भाषणावेळी व्यासपीठावरील बॅनर कोसळले

सटाणा (नाशिक) : धुळे लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाषणावेळी अचानक आलेल्या वादळवाऱ्यामुळे व्यासपीठावरील बॅनर कोसळले. सदर बॅनर पाठीमागच्या बाजूला कोसळल्याने सुदैवाने व्यासपीठावरील मान्यवर सुरक्षित राहिले. सभेच्यावेळी ही घटना घडल्याने पोलिसांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. 

 

टॅग्स :घाटकोपरमुंबई