Join us

१७ बळी गेल्यानंतर होर्डिंगचे मजबुतीकरण, घाटकोपर दुर्घटनेनंतर महापालिकेच्या धोरणात बदल

By जयंत होवाळ | Published: June 11, 2024 11:32 AM

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण ठार झाल्यावर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने होर्डिंगच्या धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. होर्डिंगचा पाया आणि त्याची मजबुती यावर नव्या धोरणात भर देण्यात आला  आहे.

- जयंत होवाळमुंबई - घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण ठार झाल्यावर जाग आलेल्या मुंबई महापालिकेने होर्डिंगच्या धोरणात महत्त्वाचे बदल केले आहेत. होर्डिंगचा पाया आणि त्याची मजबुती यावर नव्या धोरणात भर देण्यात आला  आहे. त्याचबरोबर डिजिटल होर्डिंग आणि होर्डिंगवरील प्रकाश योजना हे मुद्देही लक्षात घेऊन त्यादृष्टीने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. 

नवे होर्डिंग धोरण लवकरच  मांडण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर नागरिकांच्या सूचना आणि  हरकती मागवण्यात येतील. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवे धोरण जाहीर होईल. होर्डिंगच्या आकारात मात्र बदल सुचवण्यात आला  नसल्याचे समजते. मे महिन्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर येथे पेट्रोल पंपालगतचे महाकाय होर्डिंग कोसळून भयानक दुर्घटना घडली होती. कोसळलेल्या होर्डिंगखाली १०० जण अडकले होते. त्यापैकी १८ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर शहरातील सर्वच होर्डिंग्जचा आणि त्यांच्या मजबुतीचा   आढावा घेण्यास पालिकेने सुरुवात केली होती. काही होर्डिंग हटवण्यात आले होते.  

घटनेच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या होर्डिंग  धोरणाची चर्चा सुरू झाली होती. पालिकेच्या  धोरणात गेल्या अनेक वर्षांत काहीच बदल झालेला नाही. पालिकेच्या धोरणाची पायमल्ली करून घाटकोपर येथील होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यामुळे धोरणात बदल  करण्याची गरज निर्माण झाली होती. नवे होर्डिंग धोरण आखण्यासाठी पालिकेने तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीत ‘निरी’चे माजी अधिकारी राकेश कुमार, आयआयटी मुंबईचे प्रा. अवजीत माजी, प्रा. नागेंद्र राव, इंडस्ट्रिअल डिझाइन विभागाचे श्रीकुमार, वाहतूक विभागाचे पोलिस सहआयुक्त अनिल कुंभारे, पालिका उपायुक्त किरण दिघावकर आणि पालिकेच्या परवाना विभागाचे निरीक्षक अनिल काटे यांचा समावेश आहे. 

बळकट पाया, तगडा सांगाडा पालिकेच्या नव्या धोरणात होर्डिंगच्या मजबुतीवर भर आहे. होर्डिंग  ज्या सांगाड्यावर उभारण्यात येते, त्याची मजबुती आणि  पायाची मजबुती  या दोन मुख्य बाबींवर भर देण्यात आला आहे. थोडक्यात, होर्डिंगचे  स्ट्रक्चरल ऑडिट हा धोरणातील महत्त्वाचा भाग असल्याचे समजते. होर्डिंग उभारल्यानंतर त्याचे स्ट्रक्चरल  ऑडिट किती कालावधीने करावे याचीही तरतूद आहे.

होर्डिंगची  प्रकाशयोजना...  डिजिटल होर्डिंग आणि होर्डिंवरील प्रखर रोषणाई या दोन महत्त्वाच्या बाबीही लक्षात  घेण्यात आल्या आहेत. डिजिटल होर्डिंग आणि होर्डिंगवरील प्रखर प्रकाशामुळे लक्ष विचलित होत असल्याच्या वाहनचालकांच्या तक्रारी  आहेत.  त्यामुळे प्रकाश योजनेबद्दलही धोरणात मार्गदर्शक सूचना वा निकष असतील. होर्डिंग कोणत्या भागात  उभारायचे याही विषयी काही सूचना असल्याचे कळते.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका