Join us

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या ऑडिटरला अटक; मुलुंडमध्ये कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 9:57 AM

यासाठी किती पैसे मिळाले, त्याने कुठल्या आधारावर हे प्रमाणपत्र दिले, याबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: घाटकोपर होर्डिंग प्रकरणात अटक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने होर्डिंगसाठी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देणाऱ्या आरोपी मनोज रामकृष्णा संघू (४७) याला मुलुंडमधून बेड्या ठोकल्या आहेत. पालिका मान्यताप्राप्त ऑडिटर असलेल्या मनोजला नियमांबाबत माहिती असतानाही नियमबाह्यरीत्या अवाढव्य होर्डिंगसाठी चुकीचे प्रमाणपत्र दिल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्याला यासाठी किती पैसे मिळाले, त्याने कुठल्या आधारावर हे प्रमाणपत्र दिले, याबाबत गुन्हे शाखा तपास करीत आहे.

भावेशच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला घाटकोपर येथे उभारलेल्या १२० बाय १४०च्या होर्डिंगसाठी मनोजने २४ एप्रिल २०२३ मध्ये स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिले होते. मनोजला होर्डिंगच्या नियमांची माहिती असतानाही त्याने धोकादायक अशा होर्डिंगसाठी स्टॅबिलिटीचा सकारात्मक अहवाल दिला. त्याच प्रमाणपत्रावर विश्वास ठेवून होर्डिंगच्या पुढील प्रक्रिया पार पडल्या. याप्रकरणी गुन्हे शाखा त्याच्याकडे अधिक तपास करीत आहे. त्याने पैसे घेऊन खोटा अहवाल दिल्याची शक्यता असून गुन्हे शाखा अधिक चौकशी करीत आहे. त्याचे बँक खातेही तपासण्यात येणार असून पोलिस कोठडीसाठी मनोजला शुक्रवारी न्यायालयात हजर करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

भावेशची न्यायालयीन काेठडीत रवानगी

भावेश भिंडेची कोठडी संपल्याने गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. भावेशने पुरावे नष्ट केल्याच्या संशयातून दाखल गुन्ह्यात कलम १२०-ब वाढविण्यात आले आहे. या प्रकरणात सह आरोपी असलेली जान्हवी मराठे पसार असून तिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. जान्हवी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या भिंडेच्या कंपनीची डिसेंबर २०२३ पर्यंत संचालक पदावर काम पाहत होती. जान्हवी मराठेसह भिंडेच्या मुली आणि पत्नीच्या बँक खात्यातून पैशाचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :घाटकोपरमुलुंड