Ghatkopar Hoarding Collapse ( Marathi News ) : वादळी वारा आणि अवकाळी पावसाच्या माऱ्यामुळे मुंबई शहर आणि आसपासच्या परिसरामध्ये काल अनेक दुर्घटना घडल्या. घाटकोपर इथं बेकायदा होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर ७० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या बेकायदा होर्डिंगच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू असतानाच आता एनडीआरएफकडून धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. सदर होर्डिंगच्या पायाभरणीत मालकाकडून मोठी चूक करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
पेट्रोल पंपावर कोसळलेलं होर्डिंग हे तब्बल १४० बाय १४० चौरस फुटांचे होते. इतक्या मोठ्या आकाराचे होर्डिंग उभारताना पायाभरणी किमान ७ ते ८ फूट करणं अपेक्षित होतं. मात्र या कोसळलेल्या होर्डिंगची पायाभरणी फक्त ३ फूट इतकी असल्याचं एनडीआरएफकडून सांगण्यात आल्याचे वृत्त 'एबीपी माझा'ने दिलं आहे.
महापालिकेकडून ४० बाय ४० चौरस फुटांच्या होर्डिंगची परवानगी असतानाही बेकायदेशीरपणे महाकाय होर्डिंग लावण्यात आलं आणि ते उभारताना पायाभरणीही नीट केली गेली नाही. असं कृत्य करून नागरिकांच्या जीव धोक्यात टाकणाऱ्या होर्डिंग मालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.
होर्डिंगच्या जागेबाबत काय आहे वाद?
दुर्घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय रेल्वे यांच्यात जमिनीच्या मालकीवरून वाद सुरू झाला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ती जागा आपली नसून रेल्वे पोलिसांची असल्याचे महापालिकेने सांगितले. याप्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत रेल्वे आणि जाहिरात कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल असं महापालिकेने जाहीर केलं.
दरम्यान, महापालिकेच्या दाव्यानंतर मध्य रेल्वेने ही जमीन आपल्या मालकीची नसल्याचे म्हटलं आहे. तसेच हे होर्डिंग रेल्वेच्या जमिनीवर नसून त्याचा भारतीय रेल्वेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. "हे होर्डिंग रेल्वेच्या जमिनीवर नव्हतं. या प्रकरणाशी भारतीय रेल्वेचा कोणताही संबंध नाही," असं स्पष्टीकरण मध्य रेल्वेने एक्सवरुन दिलं आहे.