घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलाच्या वादात आता मनसेची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:40+5:302021-06-16T04:08:40+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहरात अत्यंत दाट वस्ती असलेल्या मानखुर्द परिसरातून पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबई - ...

Ghatkopar-Mankhurd flyover dispute | घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलाच्या वादात आता मनसेची उडी

घाटकोपर- मानखुर्द उड्डाणपुलाच्या वादात आता मनसेची उडी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहरात अत्यंत दाट वस्ती असलेल्या मानखुर्द परिसरातून पूर्व द्रुतगती मार्ग आणि मुंबई - पुणे महामार्ग यांना जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या रस्त्यामुळे या परिसरातील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे.

घाटकोपर - मानखुर्द लिंक रोडवरील पूर्वमुक्त मार्गाजवळून सुरु होणाऱ्या मोठ्या उड्डाणपुलाच्या नामकरणावरून भाजप खासदार मनोज कोटक व शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्यात कलगी-तुरा रंगला असताना आता या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसेचे घाटकोपर पश्चिम येथील विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांनी या उड्डाणपुलाचे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ असे नामकरण करून धनगर समाजाचा मान आणि सन्मान राखावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

या उड्डाणपुलाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे करण्याची मागणी खासदार मनोज कोटक यांनी महापालिकेतील स्थापत्य समिती उपनगरे अध्यक्ष यांच्याकडे लेखी पत्राद्वारे ९ डिसेंबर २०२० रोजी केली होती. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या उड्डाणपुलाला ‘सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोहिनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी’ यांचे नाव देण्याची मागणी लेखी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे १० जून २०२१ रोजी केली आहे. या संदर्भात लोकमत ऑनलाईनवर रविवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. ‘लोकमत’चे वृत्त सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात व्हायरल झाले, तर खासदार मनोज कोटक यांनीसुद्धा ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेतली.

गणेश चुक्कल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मानखुर्द-शिवाजीनगर आणि गोवंडी या भागातून हा उड्डाणपूल जात आहे. या परिसरात धनगर समाजबांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचसोबत धनगर समाजाचे दैवत असलेली बिरोबा आणि मायक्का देवी मंदिर याचठिकाणी आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ असे नामकरण करून धनगर समाजाचा मान आणि सन्मान राखावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

---------------------

Web Title: Ghatkopar-Mankhurd flyover dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.