घाटकोपर मानखुर्द लिंकरोड उड्डाणपूल नामकरण वाद;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:46+5:302021-06-16T04:06:46+5:30
-धार्मिक रंग देऊन राजकारणाचा प्रयत्न - खासदार राहुल शेवाळे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी ...
-धार्मिक रंग देऊन राजकारणाचा प्रयत्न - खासदार राहुल शेवाळे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नाव देण्याची मागणी केलेली असतानाही केवळ मतांच्या राजकारणासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी वेगळ्या नावाचा अट्टहास कशासाठी चालविला आहे, असा प्रश्न भाजप खासदार मनोज कोटक यांनी केला आहे. विशेष, म्हणजे आपला मतदारसंघ सोडून शेजारच्या विकासकामाबाबत शेवाळे यांनी केलेली मागणी औचित्याला धरून नसल्याचेही कोटक म्हणाले.
दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथील नवीन उड्डाणपुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले. छेडानगर ते मानखुर्द या परिसरात सुमारे ७० टक्के लोकसंख्या ही मुस्लिम असल्यामुळे या उड्डाणपुलास सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देऊन मुस्लिम समाजाच्या भावनांचा सन्मान करावा अशी मागणी शेवाळे यांनी पत्रात केली आहे. या पत्रावरून आता गदारोळ सुरू झाला आहे.
स्थानिक भाजप खासदार मनोज कोटक यांनी शेवाळे यांच्या पत्रावर आक्षेप घेतला आहे. हा उड्डाणपूल शेवाळे यांच्या मतदारसंघात मोडत नाही. शिवाय, नामकरणाचे काम महापालिकेतील स्थापत्य समितीकडे आहे. उपनगर स्थापत्य समिती अध्यक्षांना ९ डिसेंबर २०२० रोजीच मी पत्र पाठवून या उड्डाणपुलाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे करण्याची मागणी केली होती. मग, आता अचानक शेवाळे यांनी या उड्डाणपुलाला ‘सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोहिनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी’ यांचे नाव देण्याची मागणी करण्याचे कारण काय, असा प्रश्न कोटक यांनी केला. सात महिन्यापासून या उड्डाणपुलाला शिवरायांचे नाव देण्याची मागणी केली असताना केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी वेगळे नाव सुचविले काय, अशी शंका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी तहहयात राजकारण केले त्या शिवसेनेला हिंदुत्वाप्रमाणे आता शिवरायांच्या नावाचे वावडे आहे काय, असेही कोटक यांनी विचारले. मुस्लिम संतांचे नाव स्थानिक जनतेच्या सहमतीने इतर कोणत्याही विकास कामास देण्याला भाजपचा विरोध नाही, असेही कोटक म्हणाले.
चौकट
लोकप्रतिनिधी या नात्याने जनतेच्या विविध प्रकारच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविणे, हे माझे कर्तव्य आहे. उड्डाणपुलाच्या नामकरणाबाबतही तिथल्या स्थानिकांची मागणी केवळ सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम मी केले. या उड्डाणपुलाला नेमके काय नाव द्यायचे, याचा अंतिम निर्णय मुंबई महानगरपालिकेकडून यथावकाश घेतला जाईलच. मात्र, या प्रश्नाला धार्मिक रंग देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न काही राजकारणी आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत, असे राहुल शेवाळे यांनी यासंदर्भात खुलासा करताना म्हटले आहे.