घाटकोपर - मानखुर्द पुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:06 AM2021-07-30T04:06:22+5:302021-07-30T04:06:22+5:30
मुंबई : घाटकोपर - मानखुर्दला जोडणाऱ्या नव्या पुलाचे नामकरण अखेर 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
मुंबई : घाटकोपर - मानखुर्दला जोडणाऱ्या नव्या पुलाचे नामकरण अखेर 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्थापत्य समितीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी देण्यात आली. या नामकरणावरून शिवसेना - भाजपमध्ये जुंपली होती. मात्र, शिवसेनेने ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्याची तयारी दाखवत या वादावर पडदा टाकला आहे.
एम पूर्व विभागातील वीर जिजामाता भोसले मार्गावर हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’असे करण्याची सूचना भाजपने केली होती. मात्र, या पुलाचे बांधकाम पूर्ण नसल्यामुळे शिवरायांचे नाव देण्याचा प्रस्ताव गेल्या महिन्यातील स्थापत्य समितीच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला होता. यामुळे शिवसेना - भाजपमध्ये वाद रंगला होता.
त्यामुळे स्थापत्य समिती अध्यक्ष स्वप्नील टेंबवलकर, सदस्य आणि पालिका अधिकार्यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली होती. आता या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असल्याने शिवसेना नगरसेविका निधी शिंदे यांनी मांडलेली उपसूचना स्थापत्य समितीमध्ये गुरुवारी बहुमताने मंजूर करण्यात आली. त्यानुसार 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे या पुलाचे नामकरण करण्यात येणार आहे.
उड्डाणपुलामुळे २५ मिनिटांची होणार बचत
घाटकोपर - मानखुर्दला जोडणारा हा उड्डाणपूल शिवाजी नगर ते मोहिते पाटील जंक्शनपर्यंत २.९० कि. मी. तयार करण्यात आला आहे. या उड्डाण पुलामुळे शिवाजीनगर जंक्शन, बैगनवाडी जंक्शन, देवनार डंपिंग ग्राऊंड, फायर ब्रिगेड व मोहिते पाटील येथील वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. पालिकेने प्रथमच २४.२ मीटर सेगमेंट कास्टिंग तयार करून या पुलाचे बांधकाम केेले आहे. या पुलामुळे नवी मुंबई, पनवेल आणि पुणे येथे जाणार्या प्रवाशांची २५ मिनिटे वाचणार आहेत.