घाटकोपर विमान अपघात चौकशी अहवालास आणखी पाच महिने लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 05:11 AM2018-07-30T05:11:52+5:302018-07-30T05:12:28+5:30
घाटकोपर विमान अपघाताला एक महिना उलटला असून, या अपघाताची ठोस कारणे अद्याप चौकशी अहवालामधून समोर आलेली नाहीत.
मुंबई : घाटकोपर विमान अपघाताला एक महिना उलटला असून, या अपघाताची ठोस कारणे अद्याप चौकशी अहवालामधून समोर आलेली नाहीत. प्राथमिक चौकशी अहवालात विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचा दावा करण्यात आला असून, सविस्तर चौकशी अहवाल येण्यास अजून पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
२८ जून रोजी घाटकोपर येथे झालेल्या विमान अपघातात पाच जणांना जीव गमवावा लागला होता. या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास विभाग (एएआयबी) तर्फे करण्यात येत आहे. या बाबतचा प्राथमिक अहवाल तयार झाला आहे. मात्र, अधिकृतपणे यावर बोलण्यास कोणीही तयार नाही. विमान अपघाताबाबतचा सविस्तर अहवाल तयार होण्यास अजून पाच महिने लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत असून त्यानंतर नेमक्या कोणत्या कारणांमुळे हा अपघात घडला, यावर प्रकाश पडू शकेल.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सह वैमानिक मारिया जुबैरी यांचे पती प्रभात कथुरिया यांनी या बाबत केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली होती. विमान अपघाताला विमान कंपनी, डीजीसीए, विमानाची देखभाल करणारी कंपनी, विमान उड्डाणाला परवानगी देणाऱ्या यंत्रणा व विमान उतरण्याच्या मार्गात उंच इमारतींना परवानगी देणाºया महापालिकेच्या अधिकाºयांविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. अद्याप घाटकोपर पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा नोंदवलेला नसून, केवळ अपघाती मृत्यू म्हणून प्रकरणाची नोंद केली आहे. सविस्तर अहवालात ज्यांच्यावर दोषारोप असेल, त्यांच्याविरोधात पुढील कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
घाटकोपर विमान अपघातातील विमान उत्तरप्रदेश सरकारच्या मालकीचे होते. या विमानाला अपघात झाल्यानंतर सरकारने हे विमान युवाय एव्हिएशन कंपनीला विकले होते. त्यानंतर या विमानाची देखरेख इन्डेमेर एव्हिएशन कंपनीकडून केली जात होती. खराब हवामान असताना या विमानाला उड्डाणाची परवानगी कशी देण्यात आली व नागरी वस्तीवरून उड्डाण करण्याला परवानगी कशी दिली, असे प्रश्न कथुरिया यांनी उपस्थित केले होते. मात्र, अद्याप त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळालेली नाहीत.