‘मी आत्महत्या करतोय’ म्हणणारा बेपत्ता वकील सापडला जंगलात, घाटकोपर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत घेतला शोध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 08:18 AM2022-02-01T08:18:56+5:302022-02-01T08:21:16+5:30
crime News: ‘मी आत्महत्या करतोय’ अशी फेसबुक पोस्ट करीत बेपत्ता झालेल्या ३६ वर्षीय वकिलामुळे खळबळ उडाली. कुटुंबीयाकडून माहिती मिळताच, घाटकोपर पोलिसांनी विविध पथके तयार करीत शोध सुरू केला.
मुंबई : ‘मी आत्महत्या करतोय’ अशी फेसबुक पोस्ट करीत बेपत्ता झालेल्या ३६ वर्षीय वकिलामुळे खळबळ उडाली. कुटुंबीयाकडून माहिती मिळताच, घाटकोपर पोलिसांनी विविध पथके तयार करीत शोध सुरू केला. अवघ्या ३ तासांत कौशल्यपूर्ण तपास करीत पवईच्या जंगलातून वकिलाचा शोध घेत, त्याला सुखरूप कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे.
मूळचे नाशिकचे रहिवासी असलेले परमदेव अहिरराव दीड महिन्यापूर्वीच घाटकोपर परिसरात राहण्यास आले. रविवारी सायंकाळी त्यांच्या फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट कुटुंबीयाच्या नजरेत पडली. त्यानुसार, त्यांच्या नातेवाइकाने ५ वाजता घाटकोपर पोलीस ठाणे गाठून याबाबत माहिती दिली. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ३ पथके तयार करीत शोध सुरू झाला. वकिलाच्या मोबाइल लोकेशनवरून पथकाने शोध सुरू केला. मात्र, मोबाइल चालू बंद करीत असल्यामुळे पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होत होत्या. तो हिरानंदानी पवई येथील प्रतिबंधित हेलिपॅडच्या जंगलांमध्ये दरी डोंगरात असल्याचे समजताच पथकाने जंगलात शोध सुरू केला. वकिलाचे लोकेशन पवई येथील जंगल भागात असल्याने पथकाने येथील दरी, डोंगर पिंजून काढला. वकीलाने मध्येच मोबाइल बंद केल्याने त्याच्यापर्यंत पोहचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मात्र, पोलिसांना अथक प्रयत्नानंतर त्याचा शोध घेण्यास यश आले आहे. आगरकर यांच्यासह तपास अधिकारी कोकाटे, बांगर, पिसाळ व अंमलदार यांच्याकडून ३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर वकिलाला वेळीच ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. त्याचे समुपदेश करीत, त्याच्या पालकांच्या ताब्यात दिले असल्याचे आगरकर यांनी सांगितले.
जुगाराचा नाद... आणि...
वकिलाला जुगाराचा नाद लागल्यामुळे स्वतःकडील सगळे पैसे त्यात उडवले होते. हातात पैसे नाही. अशात कुटुंबीयांकडून पैसे काढण्यासाठी हा प्रकार केला असल्याची माहितीही समोर येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.