Join us

घाटकोपर स्थानकातील गर्दीचा तिढा सुटणार, तीन पादचारी पूल आणि दोन डेक उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 4:10 AM

मुंबई : घाटकोपर स्थानकात प्रवाशांच्या दररोज होणाऱ्या गर्दीचा तिढा आता सुटणार आहे. घाटकोपर स्थानकात तीन नवे पादचारी पूल व ...

मुंबई : घाटकोपर स्थानकात प्रवाशांच्या दररोज होणाऱ्या गर्दीचा तिढा आता सुटणार आहे. घाटकोपर स्थानकात तीन नवे पादचारी पूल व पूर्व पश्चिमेला जोडणारे दोन डेक उभारण्यात येणार आहेत. दुचाकींच्या पार्किंगचीदेखील व्यवस्था असणार आहे. नोव्हेंबरपासून या कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार, रेल्वे आणि एका बँकेकडून निधी संदर्भातील एका अंतिम करारावर स्वाक्षरी होणे प्रलंबित आहे. परंतु, उपलब्ध असणाऱ्या निधीतून या कामाची सुरुवात केली जाऊ शकते.

घाटकोपर हे मध्य रेल्वेवरील अत्यंत महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकाला घाटकोपर - वर्सोवा अशी एक मेट्रो मार्गिकादेखील जोडली गेली आहे. त्यामुळे या स्थानकावर दिवसभर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. घाटकोपर स्थानकात सध्या तीन पादचारी पूल असूनही या स्थानकावर प्रवाशांचा प्रचंड ताण येतो. हा गर्दीचा तिढा सुटावा, यासाठी स्थानकात पादचारी पूल व डेक या सुविधा निर्माण करण्याचा निर्णय २०१९ साली घेण्यात आला होता.

कोरोनामुळे या कामासंदर्भातील निविदा प्रक्रिया खोळंबली होती. आता घाटकोपर स्थानकात अप आणि डाऊन मार्गावर बारा मीटर रुंदीचे दोन पादचारी पूल व आणखी एका पादचारी पुलाची उभारणी केली जाणार आहे. घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमेला २७० मीटर लांबीचा व दहा मीटर रुंदीचा डेक बसविण्यात येणार आहे. प्रवाशांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होऊन घाटकोपर स्थानकावरील गर्दीवर नियंत्रण मिळवता येणार आहे.