जयंत होवाळ
मुंबई,
घाटकोपर पश्चिममध्ये मनसेने तब्बल २५ हजारांहून अधिक मते घेतल्यामुळे महाविकास आघाडीला पर्यायाने उद्धवसेनेला मोठा फटका बसला, असे म्हणता येील. महाविकास आघाडी, मनसे आणि महायुती लढतीत महायुतीचे राम कदम यांनी १२,९७१ मताधिक्याने विजय मिळवला. मात्र, गेल्या वेळच्या तुलनेत त्यांचे मताधिक्य घटले आहे.
भाजपाचेराम कदम, उद्धवसेनेचे संजय भालेराव आणि मनसेचे गणेश चुग्गल अशी तिरंगी लढत झाली. २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेल्या भालेराव यांनी ४१,४७४ मतं मिळवली होती. यावेळी ते उद्धवसेनेच्या तिकीटावर मैदानात उतरले होते. त्यामुळे ते कदम यांना तगडी लढत देतील अशी अपेक्षा होती. तशी लढत त्यांनी दिली खरी, पण मनसेच्या उमेदवाराने घसघशीत मते घेतली. वंचितच्या उमेदवारानेही काही प्रमाणात मते घेतली. या मतांनीच भालेराव यांना विजयापासून वंचित ठेवले असे म्हणता येईल. सन २०१९ च्या निवडणुकीत चुग्गल यांनी १५,०१९ मते घेतली होती. यावेळी त्यांनी थेट २५ हजार ६८२ मतं घेतली. म्हणजे मागील वेळेपेक्षा एकदम १० हजार ६६३ जास्त मते घेतली. वंचितच्या उमेदवाराने ४,६१२ मते घेतली. या मतदारसंघातील गुजराती आणि उत्तर भारतीयांची मते कदम यांच्या पारड्यात पडली असे दिसते. तर मराठी मतांचे कदम, भालेराव आणि चुग्गल यांच्या विभाजन झाले असे दिसते. भालेराव यांच्या मतांमध्ये यंदा १८,६२८ एवढी वाढ झाली. मात्र, मत विभाजनाचा मोठा फटका त्यांना बसला.
राम कदम (भाजपा)- ७३,१७१संजय भालेराव (ठाकरे गट)- ६०,२००गणेश चुग्गल (मनसे)- २५,६८२