गझल ही वृत्ती असून ती वृत्तातच हवी - ए.के. शेख
By Admin | Published: January 3, 2017 05:56 AM2017-01-03T05:56:49+5:302017-01-03T05:56:49+5:30
गझल ही वृती असून, ती वृत्तातच असायला हवी. ती वृत्तात बघण्यासाठी कवीला धीर असावा लागतो. गझलेच्या प्रेमात पडलेल्याला गझल सोडत नाही
मुंबई : गझल ही वृती असून, ती वृत्तातच असायला हवी. ती वृत्तात बघण्यासाठी कवीला धीर असावा लागतो. गझलेच्या प्रेमात पडलेल्याला गझल सोडत नाही. म्हणजेच कवीला आपल्या पूर्वीच्या कवितेच्या प्रकारातून निवृत्ती घ्यावी लागते नि तो गजलेतच रमतो, असे उद्गार कविवर्य ए. के. शेख यांनी ‘माझा मराठी गझल प्रवास’ या कोकण मराठी साहित्य परिषद, पार्ले शाखा यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, नायगाव शाखा, मुंबई यांच्यासह आयोजित केलेल्या मुलाखतीत बोलताना काढले. ही मुलाखत गौरी कुलकर्णी व लता गुठे यांनी घेतली.
चौकटीत विचार मांडायचा म्हणून कवींनी मुक्तछंद स्वीकारला; पण गझल ही कारागिरी असून त्यात कौशल्य असते. कारण गझल शब्द मागते नि ते तिला पुरवावे लागतात. म्हणून गझलकाराकडे विपुल शब्दसंपत्ती असायला हवी. तरुणपिढी गझल लिहितेय पण तिला मार्गदर्शनाची गरज आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी शशिकांत तिरोडकर, कोमसापच्या विश्वस्त रेखा नार्वेकर तर अभियंते प्रकाश कुलकर्णी, समीक्षक शिवाजी गावडे, भरत शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
या अनुषंगाने निमंत्रिताचे कविसंमेलन आयोजित केले होते. त्याचे अध्यक्षस्थान कवी - गीतकार साहेबराव ठाणगे यांनी भूषविले. त्यात वरील अतिथींसह प्रा. प्रतिभा सराफ, एकनाथ आव्हाड, सूर्यकांत मालुसरे, अनुराधा नेरुरकर, सुमन नवलकर, मनोज वराडे, लुईस कदम, रमेश ढवण पाटील, संतोष खरटमोल, मनिष मालुसरे, बंडू अंधेरे, अनुराधा म्हापणकर, कमलाकर राऊत, वैभव दळवी, पंढरीनाथ रेडकर, रेणुका पाटील आदींनी कविता सादर केल्या. त्यांस श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपदा पाडगावकर व संतोष खाड्ये यांनी केले. तर सुनील देवकुळे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)