घोलवडच्या चिकूवर अस्मानी संकट
By admin | Published: August 22, 2014 11:25 PM2014-08-22T23:25:01+5:302014-08-22T23:25:01+5:30
देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर नावाजलेले घोलवड, डहाणू, पालघर, तलासरी तालुक्यातील गोड चिकू फळ सध्या संकटात सापडले आहे.
Next
शौकत शेख- डहाणू
देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर नावाजलेले घोलवड, डहाणू, पालघर, तलासरी तालुक्यातील गोड चिकू फळ सध्या संकटात सापडले आहे. जुलै महिन्याच्या 27, 28, 29 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे चिकू झाडावरील फळे पिकून गळून पडली आहेत. शिवाय हवामानात आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने चिकू फळाला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पुढील आठ महिने चिकू फळापासून वंचित राहावे लागणार आहे. परिणामी, चिकू बागायतदार तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने बागायतदारांना नुकसानभरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी चिकू बागायतदारांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घोलवड, डहाणू, पालघर, तलासरी हा पट्टा चिकू बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. डहाणू तालुक्यात बारा हजार हेक्टर जमिनीवर तर तलासरी येथे आठ हजार हेक्टर तसेच पालघर तालुक्यात पाच हजार हेक्टर
जमिनीवर चिकू लागवड केली जाते. हे चिकू दररोज डहाणू येथून दिल्ली, राजस्थान, अजमेर, मुंबई, गुजरात, इंदोर, पंजाब, मध्यप्रदेश तसेच परदेशात जातात.
विशेष म्हणजे या परिसरात चिकूच्या मोठमोठय़ा बागा असून चिकू तोडण्यापासून ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रार्पयत घेऊन जाण्याचे काम येथील हजारो आदिवासी कामगार करीत असल्याने त्यांना गावातच रोजगार मिळत असतो. परंतु गेल्या दोन वर्षापासून येथील गोड चिकू फळ संकटात सापडले आहे. गेल्या वर्षी अती पावसामुळे चिकू बागायतीचे प्रचंड नुकसान झाले होते, तर या वर्षीही जुलैच्या मुसळधार पावसाच्या तडाख्यात ते सापडले आहे. हवामानात आद्र्रतेचे प्रमाण वाढल्याने चिकू फळ अकाली पिकून गळून गेले आहे, तर चिकूच्या झाडांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. ही परिस्थिती या परिसरातील बहुसंख्य बागायतीची झाली असल्याने चिकू शेतक:यांचे लाखोंचे नुकसान होऊन ते हवालदिल झाले आहेत.
दरम्यान, घोलवड, डहाणू, पालघर, तलासरी तालुक्यातील चिकू बागांना अतिपावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने शासनाने याबाबतीत दखल घेतली आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, डॉ. बी. डी. शिंदे, तालुका कृषी अधिकारी ईभाड, शिरसाट, उबाळे, वीरकर यांनी डहाणू, कंकराडी, राई, वाकी, कोसबाड, घोलवड, बोर्डी तसेच परिसरातील चिकू बागांना भेटी देऊन त्यांची पाहणी केली. यावेळी चिकू संघाचे अध्यक्ष विनायक बारी, देवेन राऊत, भाविन शाह, रतिलाल पटेल, मुकेश कडू, प्रवीण बारी आदी चिकू बागायतदार उपस्थित होते.
चिकूच्या नुकसानीमुळे बागायतदार कर्जबाजारी झाले आहेत. सरकारने नुकसानभरपाई सोबतच कर्ज माफ करावे.
- विनायक बारी, अध्यक्ष, महाराष्ट्र चिकू उत्पादक संघ.