मुंबई : सध्या मुंबईत ऊन-पाऊस यांचा खेळ सुरू असल्याने सरपटणारे प्राणी थेट मानवी वस्तीत आसरा शोधू लागले आहेत. यामुळे मुंबईत जंगल परिसराजवळ असणाऱ्या वस्त्यांमध्ये साप शिरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. बुधवारी पवई येथील एका चाळीच्या इलेक्ट्रिक मीटर बॉक्समध्ये घोणस हा विषारी साप जाऊन बसला होता. स्थानिकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्पमित्र हसमुख वळंजू यांना पाचारण केले. यानंतर वळंजू यांनी घटनास्थळी दाखल होत या तीन फुटी घोणस सापाची सुखरूपपणे सुटका केली. त्याच दिवशी मुलुंड येथील दर्गा मार्गावर इमारतीच्या पार्किंगमध्ये ५ फुटी नाग तर दुसऱ्या इमारतीच्या सोसायटीच्या आवारात ५ फुटी नाग आढळून आला. या ठिकाणाहूनदेखील या सापांची सुखरूपपणे सुटका करण्यात आली. यानंतर या सर्व सापांना निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. मानवी वस्तीमध्ये विषारी साप शिरण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.
पवई येथून इलेक्ट्रिक मीटर बॉक्समधून घोणस सापाची सुटका, तर मुलुंड येथून दोन नागांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:06 AM