लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातून वसईच्या दिशेने जाणारा एलपीजीचा टँकर सोमवारी दुपारी १ च्या सुमारास काजूपाड्याजवळ उलटला. त्यामधून अतीज्वलनशील वायूची गळती सुरु झाल्याने अत्यंत वर्दळीच्या अहमदाबाद-मुंबई महार्गावरील घोडबंदर रोडवर दोन्ही बाजूंची वाहतूक रात्री दहावाजेपर्यंत ठप्प होती. काजूपाडा येथे वळण घेताना तोल जाऊन तो उलटला. त्यातून ज्वलनशील वायूची गळती सुरु झाल्याने खबरदारी म्हणून टँकरपासून १०० ते २०० फूट दूरपर्यंत वाहनांना थांबविण्यात आले. ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांसह ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वायूगळती होऊ नये यासाठी फोमचा मारा टँकरवर करण्यात आला. मुंबईकडे जाणारी वाहतूक पवईमार्गे तर वसईकडे जाणारी वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात आली. अपघातामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन वाहनधारकांची प्रचंड गैरसोय झाली.ठाणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार क्रेनने तो सरळ करून गळती थांबविण्यात आली. भारत पेट्रोलियमच्या तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. हे पथक उरण येथून आले होते. आता या टँकरमधील गॅस सुरक्षितस्थळी तो नेऊन अन्य टँकरमध्ये भरण्यात येईल असे तज्ज्ञांनी सांगितले. टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात वायूचा साठा असून, त्याचा स्फोट झाल्यास ५0 ते ६0 मीटरचा परिसर उध्वस्त होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. उलटल्यानंतर टँकरला किती मोठे छिद्र पडले, त्यातून वायू गळती किती सुरु आहे, हे तपासून मदतकार्याची दिशा ठरविली गेली. गळतीच्या ठिकाणी पाण्याचा मारा अविरत सुरु आहे. जनतेची गैरसोय : अहमदाबाद-मुंबई महामार्गावरील घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक असते. धोका लक्षात येईपर्यंत शेकडो वाहने घटनास्थळापर्यंत पोहोचली होती. या वाहनांना माघारी पाठवावे लागले. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे काही ठिकाणी वादविवादाचे प्रकारही घडले. याचा परिणाम ठाणे शहरातील वाहतुकीवरही झाला. मुंबई-नाशिक महामार्गावर विवियाना मॉल, नितीन, कॅडबरी जंक्शनसह ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती.
गॅस टँकर उलटल्याने घोडबंदर रोड ठप्प
By admin | Published: July 04, 2017 6:30 AM