Join us

नाशिकमध्ये घोरपडीची लिंग आणि इंद्रजाल जप्त; 'डीआरआय'चा सापळा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 8:04 AM

पथकाने शनिवारी (दि.१३) मध्यरात्री बारा वाजता सापळा रचून एका संशयिताला अस्वलदरा भागातून जाळ्यात घेतले.

अझहर शेख, नाशिक: जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून मोठ्या प्रमाणात घोरपडीची लिंग व इंद्रजालची तस्करी होणार असल्याची माहिती भारत सरकारच्या अखत्यारीतील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय केंद्राच्या पथकाला मिळाली होती. पथकाने शनिवारी (दि.१३) मध्यरात्री बारा वाजता सापळा रचून एका संशयिताला अस्वलदरा भागातून जाळ्यात घेतले. यावेळी एक संशयित आरोपी निसटून जाण्यास यशस्वी ठरला तर दुसऱ्याच्या ताब्यातून घोरपडीचे ७८१ लिंगे व २० किलो इंद्रजाल जप्त करण्यात आले आहे. आदेश खत्री पवार (रा.अस्वलदरा, नांदगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने 5 दिवसांची वनकोठडी सुनावली.

भारत सरकारच्या अखत्यारीतील गोपनीयरीत्या तस्करीविरोधी कार्यरत असलेली गुप्तचर संस्था असलेल्या महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय केंद्राच्या अधिकाऱ्यांना नाशिकमधील मनमाड रेल्वे स्थानक परिसरातून वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. यानुसार शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास निखिल सावंत यांच्या पथकाने अस्वलदरा भागात छापा टाकून पवार यास ताब्यात घेतले. यावेळी आदेश खत्रीचा साथीदार पळून गेला. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत अनुसूची-१मध्ये संरक्षित असलेल्या घोरपड या वन्यप्राण्याची सुमारे ७८१ लिंग (हत्था जोडी) तसेच सागरी जीव असलेले इंद्रजाल (सी फॅन, सी कोरल्स) साधारणत: २० किलो असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे ३० लाख रुपये इतकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर तातडीने पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे, विभागीय वनाधिकारी (दक्षता) विशाल माळी यांना माहिती कळविण्यात आली. तातडीने प्रभारी सहायक वनसंरक्षक अक्षय म्हेत्रे, नांदगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. वनपथकाने मुद्देमालाची पडताळणी केली असता प्रथमदर्शनी जप्त केलेले घोरपडीचे लिंग व इंद्रजाल अस्सल असल्याची खात्री पटविली. डीआरआयच्या पथकाकडून मुद्देमालासह संशयित आरोपी आदेश खत्री यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध नांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयात भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत वन्यप्राणी अवयवांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास ढोले हे करीत आहेत.

गुरुवारपर्यंत आरोपीला वनकोठडीसंशयित आरोपी आदेश पवार यास नांदगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात रविवारी (दि.१४) नांदगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या पथकाने हजर केले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत पवार यास गुरुवारपर्यंत (दि.१८) वनकोठडी सुनावली.

डीआरआयच्या पथकानेही आरोपीना संशय येऊ नये म्हणून वाहनावर निळे झेंडे दाखवून ओळख लपविण्याचा प्रयत्न केला. ठरल्याप्रमाणे व्यवहार ठरताच पथकाने आत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुचाकीवरील तस्करांच्या साथीदारांनी त्यांना अडवले.  पुढे, तस्कर सावध झाला आणि काही वेळातच, टीमला सुमारे ३० दिवासींनी घेरले.  त्यातील काहींनी  अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.  ही संधी साधून तस्कर व त्याच्या साथीदारांनी दारू घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी जवळपास अर्ध्या किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत त्यांचा पाठलाग करत तस्कराच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून ७८१ हात जोडी आणि १९.६ किलो मऊ कोरलदेखील जप्त केले. याप्रकरणी डीआरआयकडून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :मुंबई