मुंबई : वाकोल्याच्या कलिना परिसरात दारूच्या नशेत हितेश गोलेचा (४५) नामक तरुणाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. त्याने नशेत गाडी चालवत एका मर्सिडीज गाडीची तोडफोड केली. पोलिसांनी त्याला याबाबत विचारले असता ‘भूत माझा पाठलाग करत होते आणि ते गाडीत येऊन बसले, म्हणून मी गाडी तोडत होतो,’ असे अजब उत्तर त्याने दिले. हे ऐकून पोलीसही चक्रावले. त्याला अटक करण्यात आली आहे.गोलेचा याचे अंधेरी पूर्व परिसरात गॅरेज आहे. मंगळवारी त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी आणलेली मर्सिडीज कार गोलेचा घेऊन निघाला होता. मुख्य म्हणजे तो दारूच्या नशेत होता. भरधाव वेगाने कार चालवत त्याने कलिना व्हिलेज परिसरातील एका गल्लीत नेली. दारूच्या नशेत असल्याने कारचे दरवाजेदेखील उघडणे त्याला शक्य होत नव्हते. तो आतच अडकला. त्यानंतर गाडी पुढे-मागे करत कसाबसा तो बाहेर आला आणि गाडीची तोडफोड करू लागला.‘आम्हाला पोलीस नियंत्रण कक्षावरून याबाबत कळाले आणि आम्ही घटनास्थळी दाखल झालो. त्यानंतर गोलेचा याला अटक करण्यात आली,’ अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास आव्हाड यांनी दिली. मात्र गोलेचाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘पाच वर्षांपूर्वी वडील कमल यांचे निधन झाले. त्यांचे भूत सतत माझा पाठलाग करत होते. कारच्या आतही ते दिसल्यामुळेच मी गाडी तोडत होतो.’पोलिसांनी मात्र त्याच्यावर चढलेले नशेचे भूत उतरवत त्याला अटक केली. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यातदेखील त्याने अंबोली पोलिसांच्या हद्दीत चार गाड्यांना धडक देत दोघांना जखमी केले होते.
भूत मागे लागले म्हणत गाडी ठोकली; एकाला अटक, वाकोला पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 6:03 AM