Join us

केईएम रुग्णालयामध्ये बदल्यांवरून ‘गोंधळ’

By admin | Published: September 12, 2014 1:14 AM

परळ येथील केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद साळवे यांना एका महिला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली

मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद साळवे यांना एका महिला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. वरिष्ठ आस्थापना विभागात हेड क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचारीची बदली स्टोअर विभागात करण्यात आली. या बदलीमुळे संतप्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याने डॉ. साळवे यांच्या कार्यालयातच त्यांना मारहाण केल्याची घटना घडली.केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांच्याकडे या महिला कर्मचाऱ्याने बदली होऊ नये, यासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात येवून या महिलेची बदली करण्यात आली. या महिला कर्मचाऱ्याला विभागीय कामकाजाशिवायही कार्यालयीन कामही करावे लागत होते. यापूर्वीही महिला कर्मचाऱ्याने दुसऱ्या एका कर्मचाऱ्याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने चौकशी समितीही नेमली होती. चौकशी समितीने या कर्मचाऱ्याला निर्दोष असल्याचे जाहीर केले. त्यानंतर या महिला कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली, यावेळी या बदलीला विरोधही झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने बदलीचा निर्णय कायम ठेवला.या संदर्भात माहिती घेण्यासाठी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. या प्रकरणी पोलिसात मात्र कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. (प्रतिनिधी)