Join us

रेल्वे हद्दीतील महाकाय ९९ होर्डिंग रडारवर; डिझास्टर अ‍ॅक्टअंतर्गत पालिकेची नोटीस

By सीमा महांगडे | Published: May 15, 2024 8:51 AM

हे महाकाय होर्डिंग्ज उभारण्यासाठी आवश्यक प्रमाणात काँक्रीट फाउंडेशन नसल्याचेही पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. 

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :घाटकोपरच्या छेडानगर येथील महाकाय होर्डिंगला पालिकेची परवानगी नव्हती. रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असल्यामुळे माजी रेल्वे पोलिस आयुक्तांकडून त्यासाठी परवानगी मिळाली होती. मुंबईभरात रेल्वे हद्दीत तब्बल ९९ धोकादायक होर्डिंग्ज असल्याचे पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे ही धोकादायक होर्डिंग्ज तातडीने हटवा, अशी नोटीस पालिकेने रेल्वे आणि संबंधितांना डिझास्टर अॅक्टखाली बजावली आहे. हे होर्डिंग्ज हटवले नाहीत तर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.

नियमानुसार होर्डिंग्जचा आकार ४० बाय ४० फूट असणे अनिवार्य असताना लोहमार्ग रेल्वे पोलिस विभागाच्या सध्या अखत्यारीत असलेले हे होर्डिंग्ज १२० बाय १२० फुटांपेक्षा जास्त आकाराचे आणि बेकायदा उभारण्यात आले होते. हे महाकाय होर्डिंग्ज उभारण्यासाठी आवश्यक प्रमाणात काँक्रीट फाउंडेशन नसल्याचेही पालिकेच्या तपासणीत समोर आले आहे. 

याच पार्श्वभूमीवर पालिकेने रेल्वे हद्दीमधील सर्व होर्डिंग्जचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये तब्बल ९९ ठिकाणची होर्डिंग्ज 'ओव्हर साइझ' असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एफ/उत्तर घाटकोपर, माटुंगा, वडाळ्यात सर्वाधिक २२ धोकादायक होर्डिंग्ज असल्याचे समोर आले आहे.

रेल्वेने काळ्या यादीत होते टाकले

घेडानगर येथे लॉर्ड सिक्युरिटी सव्र्व्हिसेस याला अयोग्य कार्यपद्धतीमुळे रेल्वेने काळ्या यादीत टाकले होते. मात्र, या कंत्राटदाराने वेगळी कंपनी स्थापन करून हे काम मिळवले होते. यासाठी त्याने टेंडर प्रक्रियाही राबवल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बेकायदा होर्डिंग्जबाबत पालिकेने जाहिरातदाराला नोटीसही पाठवली होती. शिवाय परिसरातील झाडांवर विषप्रयोग केल्याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

पेट्रोल पंपदेखील बेकायदा

जाहिरात आणि पंप उभारण्यात आलेली जमीन राज्य सरकारकडून पोलिस हाउसिंगला दिली होती. त्यांनी ती जागा लोहमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिसांकडून ही जागा पंप उभारण्यासाठी टेंडर काढून देण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी उभारण्यात आलेला पंपदेखील बेकायदा असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे पंपचालक फरार आहे.

 

टॅग्स :घाटकोपरमुंबई