बाजार समित्यांमध्ये दिग्गजांना धक्के; राहुरीत तनपुरेंचे वर्चस्व, मलकापूर भाजपकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:01 AM2023-04-29T11:01:54+5:302023-04-29T11:02:30+5:30
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत दत्तात्रेय पाटील यांच्या २६ वर्षांच्या सत्तेला विरोधकांनी सुरुंग लावला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी शुक्रवारी चुरशीने झालेल्या निवडणुकीत कुठे दिग्गजांना धक्का बसला, तर काहींना आपला दबदबा कायम ठेवण्यात यश आले आहे. राहुरी बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या पॅनलने १८ पैकी १६ जागा जिंकत भाजपच्या विखे-कर्डिले यांच्या पॅनलचा सपाटून पराभव केला. भाजपला केवळ २ जागा मिळाल्या.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीत दत्तात्रेय पाटील यांच्या २६ वर्षांच्या सत्तेला विरोधकांनी सुरुंग लावला. देवळा बाजार समितीत भाजपचे केदा आहेर व योगेश आहेर यांच्या शेतकरी विकास पॅनलने पुन्हा एकहाती सत्ता संपादित केली, तर कळवणला माजी सभापती धनंजय पवार यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. सिन्नर बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाला समान ९-९ जागा मिळाल्या.
लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कृषी विकास पॅनलने सर्वच्या सर्व १८ जागांवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. औसा बाजार समिती निवडणुकीत भाजपाचे आ. अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखालील गोपीनाथ मुंडे शेतकरी जनहित पॅनलने बाजी मारली आहे.
चाकूर बाजार समिती निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), प्रहार संघटना, रिपाइं (आठवले गट)च्या शेतकरी विकास पॅनलने १० जागा मिळवीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. महाविकास आघाडीचे ८ उमेदवार विजयी झाले आहेत. उदगीर बाजार समिती निवडणुकीत माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळविला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा बाजार समितीवर आवताडे गटाने वर्चस्व सिद्ध केले.