महिला उभारणार गिरगावातील गुढी

By admin | Published: April 6, 2016 04:20 AM2016-04-06T04:20:06+5:302016-04-06T04:20:06+5:30

गिरगावातील नववर्ष स्वागत यात्रेत विविध क्षेत्रातील ११ महिला गुढीपूजन करणार आहेत. यंदा स्वागतयात्रेचे १४वे वर्ष आहे

Giddha Gudiya will be formed by women | महिला उभारणार गिरगावातील गुढी

महिला उभारणार गिरगावातील गुढी

Next

मुंबई : गिरगावातील नववर्ष स्वागत यात्रेत विविध क्षेत्रातील ११ महिला गुढीपूजन करणार आहेत. यंदा स्वागतयात्रेचे १४वे वर्ष आहे. यंदाची संकल्पना ‘स्त्रीशक्ती अपरंपार’ ही आहे. ‘नारी के सहभाग बिना हर बदलाव अधुरा है’चा संकल्प करून स्त्रीशक्तीचे विराट दर्शन घडवून आणण्यात येणार आहे.
गिरगावातील फडके श्रीगणेश मंदिरापासून सकाळी साडेसात वाजता स्वागतयात्रेची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन, ज्येष्ठ रंगकर्मी रजनी जोशी, अभिनेत्री स्पृहा जोशी, खेळाडू क्षिप्रा जोशी, भारतीय विदेश सेवेतील अधिकारी पूजा टिल्लू, कुणबी सहकारी बँकेच्या माजी अध्यक्षा वैशाली तुपट आदी ११ मान्यवर महिला गुढीपूजन करणार आहेत.
स्वागतयात्रेत २२ फूट उंच भारतमातेच्या हातात यात्रेची मुख्य गुढी असणार आहे. कागदाचा वापर करून पर्यावरणस्नेही भारतमातेची मूर्ती मूर्तिकार योगेश इस्वलकर साकारत आहेत. मूर्तिकार संतोष कांबळी यांनी बनविलेली महिषासूर मर्दिनीची भव्य प्रतिमा, ५ अश्वांचा नयनरम्य रथ आणि कालिकामातेची १५ फूट उंच प्रतिमा या वर्षीच्या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याचे स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले. कलादिग्दर्शक तुषार कोळी सप्तश्रृंगीमातेचा सजीव देखावा सादर करणार आहेत. मूर्तिकार प्रदीप मादुस्कर यांनी बनवलेली वैभव गणेशाची मूर्ती यात्रेच्या अग्रस्थानी असणार आहे. गिरगावातील महिला, युवती गणपतीसमोर अथर्वशीर्षाचे पठण करणार आहेत.
यात्रेत महाराष्ट्राच्या लावणी, भारूड, गोंधळ, वासुदेव, नंदीबैल, कडकलक्ष्मी इत्यादी लोककलांचे सादरीकरण केले जाणार आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ या घोषणेच्या शताब्दीवर्षानिमित्त लोकमान्य टिळकांचा देखावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त त्यांचे पुण्यस्मरण करणारे चित्ररथ यात्रेत असणार आहेत. मूळ गिरगावकर असलेले महाराष्ट्रभूषण मंगेश पाडगावकर आणि माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची पुण्यस्मृतीही यात्रेच्या निमित्ताने जपण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Giddha Gudiya will be formed by women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.