लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - अर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला कोविड काळात मोठा फटका बसला. मात्र आता कोरोना नियंत्रणात असल्याने मुंबईतील सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे प्रवासी संख्या वाढावी, यासाठी अनेक नवीन योजना बेस्ट उपक्रमामार्फत राबविण्यात येत आहेत. त्यानुसार लेडिज फर्स्ट, लेडिज स्पेशल बससेवा भाऊबीजेच्या मुहूर्तावर दि.६ नोव्हेंबरपासून शंभर बसमार्गांवर बस फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.
जुलै २०१९ पासून किमान पाच रुपये तिकीट दर आकारण्यास सुरुवात केल्यानंतर बेस्ट प्रवासी संख्या ३४ लाखांवर पोहोचली. मात्र कोविड काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने बेस्टच्या उत्पन्नात मोठी घट झाली. मुंबईतील निर्बंध शिथिल करण्यात आले तरी अद्याप दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांनाच रेल्वे बसमधून प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे बेस्ट बसमध्ये प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आर्थिक संकटात असल्याने बेस्ट उपक्रमाने देखील प्रवासी संख्या वाढावी, यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार मागील महिन्याभरात काही नवीन बस मार्ग सुरु करण्यात आले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ठाणे कॅडबरी जंक्शन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भाऊचा धक्का अशा वातानुकूलित बससेवा नुकत्याच सुरु करण्यात आल्या. बुधवारपासून मुंबईत ओपन डेक बस सेवा पर्यटकांसाठी सुरु करण्यात आली आहे. तसेच १३६ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
महिलांसाठी विशेष बसगाड्या....
दररोज बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्याही अधिक आहे. गर्दीच्या वेळेत बस प्रवाशांनी खचाखच भरलेल्या असल्याने महिला प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असते. अनेकवेळा त्यांना बसमध्ये चढण्यास मिळत नाही. मात्र भाऊबीज म्हणजे ६ नोव्हेंबरपासून बेस्टच्या २७ बस आगारांमधून महिला बस प्रवाशांकरिता "लेडिज फर्स्ट, लेडिज स्पेशल" या विशेष बसफेऱ्या सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार शंभर बसमार्गांवर या बस फेऱ्या चालविण्यात येणार आहे. काही बसमार्गांवर बस केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव असेल तर काही ठिकाणी पहिल्या थांब्यावर महिला प्रवाशांना चढण्यास प्राधान्य मिळणार आहे. विशेषतः रेल्वे स्थानकाशी जोडलेल्या बसमार्गांवर ही महिला विशेष बसफेरी चालविण्यात येणार आहे. यामध्ये ९० टक्के बसगाड्या वातानुकूलित असणार आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.