Join us

भेट मिळालेली सायकल चोरीला गेली; पण १० मिनिटांत मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:47 AM

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या दहा मिनिटांत सायकल परत मिळाली

मुंबई : आई ज्या ठिकाणी घरकाम करते तेथून तिच्या मुलाला सायकल भेट मिळाली होती. दोन दिवसांनंतरच ही सायकल भाभा रुग्णालयातून चोरीला गेली. परंतु वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या दहा मिनिटांत या मुलाला सायकल परत मिळाली. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.आई आणि मुलगा वांद्रे येथे राहतात. काही कामानिमित्त ते भाभा रुग्णालयात आले होते. दरम्यान, वाहतूक पोलीस मेहबूब तांबोळी हे वॉटरफिल्ड रोड येथे गस्त घालत असताना एक गर्दुल्ला नवीन सायकल ओढत घेऊन जाताना दिसला. तांबोळी यांनी त्यास हटकले आणि सायकल कोठून आणली? असे विचारले. तो सायकल तिथेच सोडून पळून गेला. ती सायकल तांबोळी यांनी ताब्यात घेऊन त्याबाबत वाहतूक नियंत्रण कक्षास कळविले. दरम्यान, ती आई व मुलगा रडत येताना तांबोळी यांना दिसला. त्यांनी रडण्याचे कारण विचारले असता त्यांनी त्यांची सायकल भाभा हॉस्पिटल येथे ठेवली होती; ती कोणीतरी चोरून घेऊन गेले, असे तांबोळी यांना सांगितले. त्या महिलेला सायकलीचे वर्णन विचारले असता तांबोळी यांनी ताब्यात घेतलेल्या सायकलीसारखीच सायकल असल्याने तांबोळी यांच्या लक्षात आले. सायकल दाखवल्यावर तीची ओळख पटली आणि त्यांनी ती सायकल मुलाच्या ताब्यात दिली. त्या दोघांनी तांबोळी यांचे आभार मानले; तर तांबोळी यांच्या सतर्कतेचे मुंबई पोलिसांनी ट्विट करून कौतुक केले आहे.