परदेशी मित्राचे गिफ्ट अन् दीड लाखांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:06 AM2021-09-25T04:06:13+5:302021-09-25T04:06:13+5:30
मुंबई : वाढदिवसानिमित्त परदेशी मित्राने पाठविलेल्या गिफ्टसाठी घाटकोपरच्या गृहिणीला दीड लाखांचा फटका बसला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत ...
मुंबई : वाढदिवसानिमित्त परदेशी मित्राने पाठविलेल्या गिफ्टसाठी घाटकोपरच्या गृहिणीला दीड लाखांचा फटका बसला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.
घाटकोपर परिसरात राहणाऱ्या ४४ वर्षीय तक्रारदार खासगी कंपनीत नोकरीला आहे. २६ जुलैला नेल्सन नावाच्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट स्वीकारताच संवाद सुरू झाला. व्हॉट्स ॲप क्रमांक शेअर झाले. नेल्सनने तो आईसह युक्रेन येथे राहत असल्याचे सांगून तो ऑप्थोमलजिस्ट असल्याचे सांगितले. ३ सप्टेंबरला वाढदिवस असल्याने नेल्सनने गिफ्ट पाठवत असल्याचे सांगितले.
तसेच त्याने सदर गिफ्टचा ट्रॅकिंगचा कोड आणि संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक पाठविला. संबंधित व्यक्तीने कॉल करून गिफ्ट डिलिव्हर होण्यासाठी ३५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी विश्वास ठेवून पैसे भरले. पुढे अशाच प्रकारे वेगवेगळ्या शुल्काच्या नावाखाली त्यांच्याकडून १ लाख ६० हजार रुपये उकळले. पुढे गिफ्टसाठी आणखीन पैशांची मागणी केली. मात्र, त्यांना संशय आल्याने त्यांनी व्यवहार थांबविला. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशाप्रकारे अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका आणि कुणालाही आपली गोपनीय माहिती शेअर करू नका, असे आवाहन वेळोवेळी सायबर पोलिसांकड़ून करण्यात येत आहे.