पोलीस आयुक्तांकडून महिला पोलिसांना ८ तासांच्या ड्युटीचे गिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:56 AM2022-03-08T06:56:12+5:302022-03-08T06:56:34+5:30
देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या मुंबई पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो. १२ तासांची ड्युटी कागदोपत्री असली तरी हीच ड्युटी कधी-कधी १६ ते २४ तासांपर्यंत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महिला दिनानिमित्त नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडून महिला पोलिसांना अनोखी भेट देण्यात आली आहे. महिला पोलिसांची ८ तासांची ड्युटी करण्यात आल्याचे आदेश सोमवारी त्यांनी जारी केले.
देशाच्या आर्थिक राजधानीच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या मुंबई पोलिसांवर कायमच कामाचा ताण असतो. १२ तासांची ड्युटी कागदोपत्री असली तरी हीच ड्युटी कधी-कधी १६ ते २४ तासांपर्यंत होते. याचा परिणाम पोलिसांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासोबतच कौटुंबिक आयुष्यावर होत होता. त्यामुळे अन्य आस्थापनांप्रमाणेच मुंबई पोलिसांच्या ड्युट्या आठ तास करण्याच्या उपक्रमाचा प्रस्ताव देवनार पोलीस ठाण्यातील रवींद्र पाटील यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्या समोर मांडला होता.
मे २०१६ रोजी देवनार पोलीस ठाण्यासोबत काही पोलीस ठाण्यामध्ये आठ तासांच्या ड्युटीचा सुरू करण्यात आलेला हा उपक्रम यशस्वी ठरू लागल्यानंतर शहरातील सर्व पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यासाठी पडसळगीकर यांनी प्रयत्न केले. अखेर, दीड वर्षापासून प्रायोगिक तत्त्वावर केलेल्या अंमलबजावणीत चांगला प्रतिसाद मिळताच, १ जानेवारी २०१७ पासून मुंबईत सर्वत्र याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पडसळगीकर यांनी घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात या सेवा बंद होत काही ठिकाणी १२ तास सेवा, २४ तास आराम ड्युटीची पद्धत सुरू केली. अनलॉकच्या काळात पुन्हा काही पोलीस ठाण्यात ८ तास सेवेला सुरुवात झाली आहे. मात्र त्यानंतर ती पुन्हा बंद पडली.
राज्याचे पोलीस महासंचालक असताना पांडे यांनी राज्यात महिला पोलिसांना आठ तास ड्युटीचे आदेश जारी केले होते. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार होती. मात्र, मुंबई पोलिसांनी त्याची अंमलबजावणी केली नव्हती. आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पांडे यांनी दुसऱ्या आठवड्यातच महिलांसाठी ८ तास ड्युटीचे आदेश जारी करत त्यांना अनोखी भेट दिली आहे.
असतील तीन शिफ्ट
आठ... आठ तासांच्या तीन सत्रांमध्ये महिला पोलीस काम करणार आहेत. याबाबतचे दोन पर्याय आयुक्तांनी दिले असून, त्यानुसार अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत.