हवाई प्रवाशांना मुंबई विमानतळाकडून गिफ्ट; एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर पोहोचण्यासाठी मोफत वाहतूक व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 05:56 AM2022-04-16T05:56:37+5:302022-04-16T05:57:08+5:30
मुंबई विमानतळाच्या एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर पोहोचण्यासाठी प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि अतिरिक्त खर्च आता वाचणार आहे.
मुंबई :
मुंबई विमानतळाच्या एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलवर पोहोचण्यासाठी प्रवाशांना होणारा मनस्ताप आणि अतिरिक्त खर्च आता वाचणार आहे. विमानतळाच्या दोन्ही टर्मिनलना अंतर्गत वाहतूक व्यवस्थेने जोडण्यात आले असून, वैध तिकीटधारकांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली
जाणार आहे.
शुक्रवारी दुपारी तीन वाजता ती प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. सुरुवातीच्या टप्प्यात तीन वाहने तैनात केली असून, येत्या काळात त्यात वाढ केली जाणार आहे. या वाहनांना टर्मिनल एक आणि दोनवर विशिष्ट जागी थांबे देण्यात आले आहेत. टर्मिनल एकवरून सुटणारे वाहन परतीच्या प्रवासात टर्मिनल दोनवरून प्रवाशांची दुसरी खेप घेऊन पुन्हा मार्गस्थ होईल. ही अंतर्गत वाहतूक व्यवस्था २४ तास कार्यरत असेल, अशी माहिती मुंबई विमानतळ प्रशासनातर्फे देण्यात आली.
मुंबई विमानतळाच्या दोन्ही टर्मिनलमधील अंतर हे सुमारे २० ते ३० मिनिटांचे आहे. मात्र, या प्रवासासाठी खासगी टॅक्सी, रिक्षाचालक ५०० ते १ हजार रुपये मागतात. कनेक्टेड फ्लाईट असणाऱ्यांकडून तर मनमर्जीनुसार पैसे उकळले जातात. विमानाची वेळ चुकू नये म्हणून कित्येवेळा प्रवासी मुकाट्याने पैसे देतात. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरू केल्याची माहिती मुंबई विमानतळाशी संंबंधित एका अधिकाऱ्याने दिली.