मुंबई - मुंबईच्या किनारपट्टीला आॅलिव्ह रिडले प्रजातींची कासवे मोठ्या प्रमाणात येतात. मार्च महिन्यामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या विशाल कोळी यांच्या गिलनेट जाळ्यामध्ये आॅलिव्ह रिडले प्रजातीचे एक कासव आढळून आले होते. कासवाची सुटका करताना जाळे कापून टाकावे लागले. जाळ्याचे नुकसान झाले़ जाळ्याची नुकसानभरपाई म्हणून मुख्य वनसंरक्षक, कांदळवन विभाग यांच्या मॅनग्रोव्ह सेलमार्फत २५ हजार रुपयांचा निधी कोळी यांना देण्यात आला आहे.नुकसानभरपाईसाठी शासनाच्या जीआरनुसार जाळ्याचे फोटो आणि व्हिडीओ कांदळवन विभाग आणि फिशरीज विभागाला पाठवले होते़ नुकसानभरपाईच्या कागदपत्रांची पूर्तता मत्स्य विभागाने केली होती. सततच्या पाठपुराव्याने जून महिन्यात अखेर गिलनेट जाळ्याची नुकसानभरपाई मिळाली. मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जाळ्यामध्ये कोणताही दुर्मीळ सागरी जीव आढळून आल्यास त्याची सुखरूप सुटका मच्छीमार बांधव नक्की करतील, अशी माहिती मच्छीमार योगेश पगडे यांनी दिली.आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासव सोडले समुद्रातमुंबई : रॉ संस्थेला काही दिवसांपूर्वी वर्सोवा बीच आणि कुलाबा येथील ससून डॉक येथून दोन आॅलिव्ह रिडले या दुर्मीळ प्रजातीची कासवे जखमी अवस्थेत आढळून आली होती. संस्थेने दोन्ही कासवांवर उपचार सुरू केले. सहा दिवसांच्या उपचारानंतर ससून डॉक येथून रेस्क्यू केलेल्या कासवाला शनिवारी अरबी समुद्रात सोडण्यात आले. वर्सोवा येथील कासवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी आणखी एक आॅलिव्ह रिडले प्रजातीचे कासव रेस्क्यू करण्यात आले असून त्याचीही परिस्थिती गंभीर आहे.वर्सोवा येथे आढळलेल्या कासवाच्या गळ्यामध्ये मासे पकडण्याचा गळ अडकला होता. त्या कासवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पशुवैद्यक डॉ. रीना देव यांच्या दवाखान्यात कासवावर उपचार सुरू होते़ उपचारावेळी कासवाचे एक्स-रे काढले गेले.
कासवाची सुटका करताना गिलनेट जाळीचे नुकसान; २५ हजार रुपये भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 3:21 AM