Join us

गीर गाय जातीचे वळू ब्राझीलमधून करणार आयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 4:06 AM

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्राझीलमधून शुद्ध गीर वंशाचे दहा वळू जागतिक निविदा काढून खरेदी ...

पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ब्राझीलमधून शुद्ध गीर वंशाचे दहा वळू जागतिक निविदा काढून खरेदी करण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. नागपूर येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळामार्फत ही प्रक्रिया पार पाडली जाईल.

यासंदर्भात आयोजित बैठकीत पशुसंवर्धन मंत्री केदार म्हणाले, गीर वंशाच्या वळूंच्या खरेदीसाठीच्या निविदेचे प्रारूप राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडून महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाला देण्यात आले आहे. त्यानुसार ब्राझीलमधून या वळूंची आयात करण्यापूर्वी केंद्र शासनाच्या सर्व आवश्यक निकषांप्रमाणे सर्व रोगमुक्त असल्याबाबतच्या तपासण्या, वंशावळीची खातरजमा (डीएनए तपासणीद्वारे) करून खरेदी करण्यात येणार आहे. गीर वळूपासून वीर्य रेतमात्रा तयार करून त्याद्वारे राज्यात शुद्ध गीर प्रजातीच्या पैदासीद्वारे शेतकऱ्यांचे व पर्यायाने राज्याचे दूध उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. डिसेंबर २०२१ पूर्वी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून कृतीबंध आराखडा तयार करून वळूंची आयात करून प्रक्षेत्रवर करण्यात यावेत, अशा सूचना मंत्री केदार यांनी या वेळी दिल्या.

या बैठकीत विदर्भातील नावीन्यपूर्ण व विशेष घटक शेळी गट वाटपाबाबतही चर्चा करण्यात आली. सानेन शेळी आयात करण्यासंदर्भात एजन्सीकडून माहिती घेण्यात आली. नागपूर येथील मदर डेअरीमार्फत कार्यरत दूध प्रक्रिया व दूध भुकटी प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली. विदर्भ आणि मराठवाड्यात दूध भुकटी प्रकल्प सुरू करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना केदार यांनी दिल्या. या बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या प्रतिनिधींसह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.