मुंबईत पुन्हा उभे राहणार गिरणगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 06:57 AM2017-08-09T06:57:09+5:302017-08-09T06:57:09+5:30
मुंबईचे वैभव असलेल्या गिरणी उद्योगाची स्मृती जपण्यासाठी काळाचौकी येथे वस्त्रोद्योग संग्रहालय उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र सरकारी लालफितीत अडकलेल्या शिवसेनेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग अखेर सात वषार्नंतर मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईचे वैभव असलेल्या गिरणी उद्योगाची स्मृती जपण्यासाठी काळाचौकी येथे वस्त्रोद्योग संग्रहालय उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र सरकारी लालफितीत अडकलेल्या शिवसेनेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग अखेर सात वषार्नंतर मोकळा झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या युनायटेड टेक्सटाईल मिल क्रमांक दोन व तीनच्या भूखंडांवर वस्त्रोद्योग वस्तूसंग्रहालय उभारण्यात येणार आहे. तत्पूर्वी जे. जे. कॉलेज आॅफ आर्किटेक्चर यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पावर पालिका तीनशे कोटी रुपये खर्च करणार असून सल्लागारांना १५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
१९८२ मध्ये झालेल्या संपामुळे गिरण्या मुंबईतून नामशेष झाल्या. त्यामुळे एकेकाळी मुंबईचे वैभव असलेल्या या वस्त्रोद्योगाची स्मृती पुसली जाऊ नये यासाठी काळाचौकी येथे मिलच्या जागेवर वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय २०११ मध्ये घेण्यात आला होता. अशी घोषणाच करीत शिवसेनेने पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूदही करून घेतली होती. मात्र मिलच्या जागेत बदल करण्यास पुरातन वस्तू समितीकडून आक्षेप घेण्यात आला होता. तसेच या प्रकल्पासाठी खर्च पालिका करणार की केंद्र सरकार? असा सवालही समितीने उपस्थित केला होता.
या वस्तूसंग्रहालयाच्या माध्यमातून शंभर वर्षे जुने गिरणगावच साकारणार आहे. कापड उद्योग ग्राम या संकल्पनेवर हे वस्तूसंग्रहालय विकसित केले जाणार आहे. या कामासाठी पुरातन वास्तूंच्या नुतनीकरणाचा अनुभव असलेल्या महापालिकेचे प्रस्थापित सल्लागार इच्छुक होते. मात्र या कामाचे महत्त्व व अनुभव लक्षात घेता सल्लागार म्हणून सरकारी उच्च दर्जाची संस्था म्हणून सर जे.जे. कॉलेज आॅफ आॅर्किटेक्चर यांना सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यावर शिक्कामोर्तब झाले. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी आला आहे.
असे असेल वस्तुसंग्रहालय :
गिरणीतील कामकाजाची पद्धत, जुने यंत्र व कामगार, कामगारांचे दैनंदिन जीवन, त्यांचे राहणीमान, चाळींची प्रतिकृती, गिरणीच्या परिसरात उदयास आलेली संस्कृती आपल्याला येथे दिसेल.
या प्रकल्पावर पालिका तीनशे कोटी रुपये खर्च करणार आहे.
एकेकाळी मुंबईचे वैभव असलेल्या वस्त्रोद्योगाची स्मृती पुसली जाऊ नये यासाठी काळाचौकी येथे मिलच्या जागेवर वस्तुसंग्रहालय उभारण्याचा निर्णय २०११ मध्ये घेण्यात आला होता.
शिवसेनेने या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करीत अर्थसंकल्पात तरतूदही केली होती.