- सागर नेवरेकर
मुंबई : मराठी आणि गुजराती ख्रिश्चनांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रॅन्टरोड येथील इम्यॅन्युअल चर्चला (गिरगाव मराठी चर्च) यंदा १५० वर्षे पूर्ण झाली. रविवारी मोठ्या उत्साहात या चर्चचा वर्धापन दिन पार पडला. चर्चचे जुने दगडी बांधकाम, त्यावरची देखणी रोषणाई आजही मुंबईकरांना भुरळ घालते. त्यामुळेच वर्धापन दिनी येथे ख्रिश्चन धर्मियांसोबतच अन्य धर्मियांचीही रेलचेल दिसून आली.
इमॅन्युअल चर्चचे बांधकाम टी. के. वेदर हेडस् यांनी १८०० साली सुरू केले. १८६९ साली चर्च बांधून पूर्ण झाले. हे चर्च ‘गव्हर्नर आॅफ बॉम्बे’ यांच्यासाठी बांधण्यात आले होते. ब्रिटिश राजवटीत गव्हर्नर मलबार हिल येथे वास्तव्यास होते व ते घोड्याच्या बग्गीतून चर्चकडे यायचे. चर्चचे बांधकाम गॉथिक शैलीनुसार करण्यात आले असून, दगड पोरबंदरवरून आणण्यात आले होते. चर्चचा आकार हा क्रॉससारखा असून, उंचावरून पाहिल्यावर क्रॉस दिसतो. चर्चमध्ये बॅप्टीझ इर्मशन टँक (ख्रिश्चन धर्म स्वीकारताना विधी करण्याची जागा) आहे. चर्चमध्ये अशा प्रकारचा टँक हा दक्षिण मुंबईमध्ये कुठेच नाही. कालांतराने गिरगावातील मराठी ख्रिश्चन बांधवांना हा चर्च वापरण्यासाठी देण्यात आला. तेव्हापासून चर्चला ‘गिरगाव मराठी चर्च’ असे नाव पडले, अशी माहिती पॅस्टोरल कमिटीचे सचिव अॅड. दीपक जाधव यांनी दिली.
मुंबई हेरिटेज कमिटीने चर्चला ‘ग्रेड टू’चा हेरिटेज दर्जा दिला आहे. ‘ग्रेट वन’ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. चर्च चालविण्यासाठी कोणाकडूनही निधी घेतला जात नाही. ते सर्व मराठी बांधवांसाठी चर्च खुले असून, काही गुजराती बांधवही चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी येतात.जुनी ओळख कायमपहिले मराठी फादर (रेर्व्हन) आप्पाजी बापूजी यार्डी हे होते. १८६९ सालापासूनच्या विवाह सोहळ्याचे रेकॉर्ड चर्चमध्ये आजही जशास तसे उपलब्ध आहे. चर्चमध्ये बॅप्टीझमच्या विधीची जुनी नोंदही आहे. चर्चची जी जुनी ओळख ती तशीच ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चर्चमध्ये बेंचेसही ब्रिटिशकालीन आहेत.