मुंबई - क्षितीज पटवर्धन लिखित-दिग्दर्शित 'दोन स्पेशल' या मराठी नाटकात जितेंद्र जोशीसोबत काम केल्यानंतर गिरीजा पुन्हा रंगभूमीकडे वळली आहे. १९व्या शतकातील गायिका गौहर जान यांच्यावर आधारलेल्या 'गौहर' या इंग्रजी नाटकात शीर्षक भूमिका साकारत गिरीजाने आठ गाणीही लाईव्ह गायली आहेत.
शाहरुख खानच्या 'जवान'मध्ये सहाय्यक भूमिकेत झळकल्यानंतर 'व्हॅक्सिन वॅार' या हिंदी चित्रपटात गिरीजाने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारली. लवकरच तिची हिंदी वेब सिरीजही येणार आहे. त्यापूर्वी ती इंग्रजी नाटकात गौहरच्या भूमिकेत दिसणार आहे. लिलेट दुबे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'गौहर' या नाटकात गिरीजासोबत नीना कुळकर्णीही आहेत. विविध भाषांमध्ये गाणाऱ्या कोलकात्यातील प्रसिद्ध गायिका गौहर जान यांची कारकिर्द १९व्या शतकाच्या सुरुवातीला बहरली होती. व्हॅक्स रेकॅार्डवर गाणी रेकॅार्ड होणाऱ्या गौहर आशियातील पहिल्या आर्टिस्ट आहेत. गौहरच्या विविध राग-बंदिशी अडीच मिनिटांच्या छोट्या कंपोझिशन्स रेकॅार्ड प्रचंड महागड्या असूनही जगभर गाजल्या. अशा गौहरचा प्रवास नाट्यरूपात रसिकांसमोर येत आहे. गायकीसोबतच पैशानेही खूप श्रीमंत असलेल्या गौहर यांच्या आयुष्यातील उतार-चढावांवर आधारलेले 'गौहर' हे नाटक आहे. यात गौहरची व्यक्तिरेखा गिरीजा साकारत आहे. एप्रिलमध्ये या नाटकाचे दोन प्रयोग मुंबईत होणार आहेत. यात गिरीजा वेगवेगळ्या भाषांमध्ये आठ गाणी गाणार आहे. बंगाली, कानडी, इंग्रजी आणि उरलेली हिंदीत आहेत. बऱ्यापैकी क्लासिकल असलेली ही गाणी गिरीजा लाईव्ह गाणार आहे. याबाबत 'लोकमत'शी बोलताना गिरीजा म्हणाली की, स्वत:च्या आनंदासाठी मी बरीच वर्षे गाणे शिकत आहे. 'गौहर'मुळे अभिनय आणि गाण्याचा संगम जुळून आला आहे. अचानक माझ्याकडे या नाटकाची आॅफर आली आणि अक्षरश: चार दिवसांमध्ये तालिम करून रंगभूमीकडे पुन्हा वळले. हे नाटक इंग्रजीत असले तरी गाणी हिंदी आणि इतर भाषांमध्ये आहेत. गाण्यांची तयारी करावी लागली. नाटक या माध्यमावर माझे प्रचंड प्रेम आहे. अभिनयासोबत यात गाणेही असल्याने आयते ताटच वाढून ठेवलेले होते असेही गिरीजा म्हणाली. भाषांवर प्रेम...माझे भाषांवर खूप प्रेम आहे. मी गुजराती व्यवस्थित बोलते. मराठी मातृभाषा आहेच, पण हिंदी-इंग्रजीही चांगली बोलते. ज्या भाषेत काम करायचे त्याचा अभ्यास करते. स्थानिकांसोबत राहून भाषेचा उच्चार आणि हेल समजून घेते. प्रत्येक भाषेचे सौंदर्य जाणून घेऊन ती आत्मसात करायला आवडते. गायनासाठी झाला फायदा...मराठीसारखीच इंग्रजी हीदेखील माझी जवळपास पहिली भाषा असल्यानेही हे नाटक करणे सोपे झाले. कन्नड भाषेत चित्रपट केला असल्याने कानडी माहित आहे. त्यामुळे कन्नड गाणं गाताना समस्या आली नाही. व्यवस्थित लिहून दिल्यास कानडीही बोलू शकते. या सर्वांचा गाताना फायदा झाला.