Join us

गिरीश बापट यांचे विदर्भाशी अनोखे नाते

By यदू जोशी | Updated: March 29, 2023 14:20 IST

पुण्याच्या जनजीवनाशी एकरूप झालेले गिरीश बापट यांचे विदर्भाशी अनोखे नाते होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - पुण्याच्या जनजीवनाशी एकरूप झालेले गिरीश बापट यांचे विदर्भाशी अनोखे नाते होते. त्यांचे मूळ गाव अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर. तेथे त्यांची आजही शेती आहे. अगदी गेल्यावर्षीपर्यंत ते त्या ठिकाणी जावून शेती पाहत असत. 

बापट यांचे वडील भालचंद्रराव हे कँटोन्मेंट बोर्डात नोकरीला होते. बदली होवून ते पुण्याला गेले आणि मग तिथेच स्थिरावले. मात्र त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने सावंगी मग्रापूरशी असलेली नाळ तुटू दिली नाही. आजही या परिवाराची तिथे शेती आहे. गिरीश बापट यांनी या गावी शेती करण्याबरोबरच २०१७ मध्ये वात्सल्य गोशाळा आणि गोवंश संशोधन केंद्राची उभारणी केली. आजही हे केंद्र उत्तमरित्या चालविले जाते. ते ४२ एकरांमध्ये विस्तारले आहे. भाकड गोवंशाची निगा राखण्याबरोबरच देशी गायींचे प्रजनन यावर या ठिकाणी काम केले जाते. 

गिरीश बापट यांची आई प्रतिभा यांचे माहेर चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनोरा भिलटेक. त्या जोशी घराण्यातल्या. बापट यांचे एक मामा चांदूर रेल्वेला तर दुसरे बडनेराला आजही वास्तव्याला आहेत. त्यांचे चुलत बंधू विश्राम बापट हे अमरावतीला असतात. बापट यांचे निकटवर्ती सोपानभाऊ गोडबोले यांनी ही माहिती दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :गिरीष बापट