'मेडिकल'च्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी गिरीश महाजन यांची मोठी घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 08:57 PM2019-07-24T20:57:28+5:302019-07-24T21:04:37+5:30
वैद्यकीय सेवेतील सर्वच परीक्षा या नीट परीक्षेमार्फत घेण्यात येत आहेत.
मुंबई - वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एबीबीएस प्रवेशासाठीच्या 800 ते 900 जागा वाढवल्या आहेत. तसेच आगामी काळातही 1000 जागा वाढवून आणू आणि खुल्या प्रवर्गालाही न्याय देऊ, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी लोकमत वेलनेस आयकॉन सोहळ्यात बोलताना दिले. केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाईल. हळूहळू ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले.
वैद्यकीय सेवेतील सर्वच परीक्षा या नीट परीक्षेमार्फत घेण्यात येत आहेत. समाजाला दर्जेदार डॉक्टर मिळण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं. राज्यातील आरक्षणाची टक्केवारी वाढल्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर त्याचा परिमाण होतं आहे. मात्र, खुल्या प्रवर्गासाठीही वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही नाराज करणार नसल्याचे महाजन म्हणाले. पुढील वर्षी अजून वैद्यकीय कॉलेज येतील, त्यामुळे येणाऱ्या काळात 1 हजार जागा वाढवून आणू, असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे. मराठा समाजाला आरक्षणा दिल्यानंतर राज्य सरकारने जवळपास 970 एमबीबीएसच्या जागा वाढवून आणल्या आहेत. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना एमबीबीएसला प्रवेश मिळणार आहे. मात्र, खुल्या प्रवर्गातही या जागा वाढवून देण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्यावर्षी एमबीबीएस अभ्यासक्रमामध्ये खुल्या प्रवर्गाला 1134 जागा मिळाल्या होत्या. यावर्षी आर्थिक दुर्बल घटकांसाठी 10% व सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरिता 12 टक्के आरक्षण लागू झाले. त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या 259 जागा कमी झाल्या असून त्यांच्या वाट्याला 875 जागा आल्या आहेत. या जागांवर आरक्षित प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेण्याची मुभा आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गावर अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. त्याअनुषंगाने महाजन यांना प्रश्न विचारण्यात आला होता.