मुंबई - राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं, नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. यावेळी, भाजप नेत्याच्या मुलीच्या लग्नात कारपेट तब्बल साडे नऊ कोटींचं वापरल्याचां गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यानंतर, भाजप नेते या पत्रकार परिषदेवरुन शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, राऊत यांनी 4 वाजता पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. यावेळी, राऊत यांनी किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख करत त्यांनी केलेल्या काही आरोपांवर खुलासा केला. त्यानंतर, भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच, या पत्रकार परिषदेतून आरोपांशिवाय काहीच साध्य झालं नसल्याचंही राऊत यांनी म्हटलंय.
'संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे, खोदा पहाड निकला चुहा. पण, इथं तर चुहा पण निघाला नाही', असे म्हणत भाजप नेते गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टीका केली. शिवसेनेची इतकी वाईट अवस्था कधीही झाली नव्हती. संजय राऊत यांनी आरोप करतांना कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे व पुरावे सादर केले नाहीत. नुसतेच आरोप केलेत, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला, इतकं कमिशन खाल्ल गेलं, याला काहीही अर्थ नाही
राऊतांनी बोलताना तारतम्य ठेवायला हवं
संजय राऊत हे सामनाचे संपादक आहेत, पण त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत बेछूट आरोप केलेत, त्यांनी बोलतांना तारतम्य ठेवायला हवं. केंद्रीय तपास यंत्रणांवर त्यांनी आक्षेप घेण चुकीचं, त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर सादर करावेत. आजच्या पत्रकार परिषदेचा गाजावाजा किती केला, पण ती खोदा पहाड निकला चुहा अशीच राहिली, इथं तर चुहा पण निघाला नाही. त्यामुळं आता त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.