मुंबई: मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील हार्बर मार्गावर एका धावत्या लोकलमध्ये २० वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. द्वितीय श्रेणीच्या महिलांच्या डब्यात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ०७ वाजून २८ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT वरून पनवेलला जाणाऱ्या लोकलमध्ये ही घटना घडली आहे. आरोपी ट्रेन सुरू होताच महिलांच्या डब्यात चढला आणि तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. मस्जिद स्थानक येताच पीडित तरुणी ट्रेनमधून उतरली आणि तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि आठ तासांत आरोपीला शोधून त्याला बेड्या ठोकल्या. आरोपीचे नाव नवाज करीम असून, त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
महिलांच्या डब्यात एक पोलीस कर्मचारी तैनात असतो. मात्र, ही घटना घडली, तेव्हा पोलीस कर्मचारी डब्यात नव्हता. याचाच गैरफायदा आरोपीने घेतला. यावेळी डब्यात एक वृद्ध महिला प्रवास करत होती. या महिलेला आरोपीने धमकावले. पीडित तरुणी परीक्षेसाठी जात होती. या तरुणीला आरोपीने मारहाणही केली. मात्र, मस्जिदला ट्रेन येताच तरुणीने आरोपीला जोरदार धक्का दिला आणि तिथून पळ काढला. पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. आठ तासात आरोपीचा छडा लावून पोलिसांनी त्याला अटक केली.
दरम्यान, पोलिसांची ड्युटी बदलत असल्यामुळे त्यावेळी महिलांच्या डब्यात पोलीस कर्मचारी तैनात नव्हता, अशी माहिती देण्यात आली आहे.