लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : वासिंद-आसनगाव मार्गावर मृत्यू झालेल्या आकांक्षा जगताप (१७ रा. डोंबिवली) हिने प्रेमप्रकरणामुळे लोकलमधून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी शनिवारी दिली. अद्याप संबंधित मुलाचा शोध लागला नसून तो डोंबिवलीत राहणारा असून तोही अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
मृत्यू झाल्यापासून पोलिसांनी त्या घटनेचा तपास सुरू केला. आधी पालकांशी आणि त्यानंतर तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. त्यात जी माहिती उघड झाली त्यावरून आकांक्षाने आत्महत्या केल्याचे निष्पन्न होत असल्याचे कांदे यांनी सांगितले.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार साधारण चार महिन्यांपासून तिचे प्रेमप्रकरण सुरू होते. तिच्या कुटुंबीयांना त्याबाबत तिच्या लहान बहिणीकडून माहिती मिळाल्याने कल्पना होती, मात्र एवढ्या टोकाची भूमिका मुलगी घेईल, असे मात्र त्यांना वाटले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
तिच्या मृत्यूच्या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला असून त्यांच्याकडून जशी जमेल तेवढी माहिती तपास यंत्रणेने मिळवली. मैत्रिणींच्या चौकशीत आणखी माहिती मिळाल्याने घटनेचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.