धक्कादायक! टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधानं दात घासले, मुलीचा मृत्यू; मुंबईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 03:36 PM2021-09-14T15:36:09+5:302021-09-14T15:36:33+5:30
टूथपेस्ट समजून चुकून उंदीर मारण्याच्या औषधानं दात घासल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतल्या धारावीत घडली आहे.
टूथपेस्ट समजून चुकून उंदीर मारण्याच्या औषधानं दात घासल्यामुळे एका मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुंबईतल्याधारावीत घडली आहे. मृत्यू झालेल्या मुलीचं नाव अफसाना खान असून ती १८ वर्षांची होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी उठल्यानंतर दात घासण्यासाठी गेलेल्या अफसाना हिच्या डोळ्यांवर झोप होती त्यामुळे तिनं चुकून टूथपेस्ट ऐवजी उंदर मारण्याच्या औषधानं दात घासले. पण टूथपेस्टची चव नसल्याचं तिला तातडीनं लक्षात आलं आणि त्यानंतर तिनं चूळ देखील भरली. मात्र तोवर ती भोवळ येऊन खाली कोसळली होती.
कुटुंबीयांनी अफसाना हिला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पण विष तिच्या शरीरात पसरल्याचं डॉक्टरांनी उपचारादरम्यान सांगितलं. रविवारी संध्याकाळी तिचं निधन झालं. अफसानाच्या कुटुंबात तिची आई, दोन वर्षांनी मोठी एक बहिण आणि दोन लहान भाऊ असा परिवार आहे.
नेमकं काय घडलं?
मृत पावलेली १८ वर्षीय अफसाना खान मुंबईतीलधारावी येथे राहत होती. शुक्रवारी सकाळी ती जेव्हा झोपेतून उठली तेव्हा नेहमीप्रमाणं ती दात घासण्यासाठी वॉशरुममध्ये गेली. दात घासण्यासाठी अफसाना उठलेली असली तरी तिच्या डोळ्यांवर अजूनही झोप होती. याच गडबडीत उंदीर मारण्याच्या औषधाची पेस्ट तिनं चुकून टूथपेस्ट समजून ब्रेशवर घेतली आणि ब्रश करण्यास सुरुवात केली. टूथपेस्टची चव वेगळीच लागल्यानं तिनं चूळ भरली खरी पण तोवर बराच उशीर झाला होता. तिच्या शरीरात विष पसरलं होतं. अफसानाला तातडीनं जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांकडून तिच्यावर उपचार देखील सुरू होते. पण दोन दिवसांच्या उपचारानंतर अफसाना हिचा मृत्यू झाला आहे.
अफसाना एका गरबी कुटुंबातील असून तिची आई फळं विकून घर चालवते. अफसानाला शिक्षणाची आवड होती आणि उच्च शिक्षण घेण्याचं तिचं स्वप्न होतं. या घटनेनंतर कुटुंबीय आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून चौकशीला देखील सुरुवात केली आहे. तसंच किटकनाशकं आणि जीवास धोका पोहोचविणाऱ्या वस्तू मुलांच्या सहज हाती लागतील अशा ठिकाणी ठवू नयेत असं आवाहन देखील केलं आहे.