डोंबिवली : हेदुटणे गावातील राणी ढाब्याजवळ असलेल्या खदाणीच्या पाण्यात रविवारी एक मुलगी बुडाल्याची घटना घडली. तिची आई आणि लहान बहीण पाण्यात बुडत होते. त्यांना वाचवण्यासाठी तिने पाण्यात उडी मारली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून तिचा शोध सुरू होता. मात्र अंधार पडल्यावर शोधकार्य थांबविण्यात आले.
खदाणीच्या परिसरात राहणारी गीता शेट्टी ही लहान मुलगी परी (वय ४) आणि मोठी मुलगी लावण्या (वय १६) यांच्यासह रविवारी दुपारी कपडे धुण्यासाठी खदाणीवर गेली होती. खेळता खेळता परीचा पाय घसरून ती पाण्यात पडली. बुडत असलेल्या परीला वाचविण्यासाठी गीताने पाण्यात उडी मारली. दोघी पाण्यात बुडत असल्याचे पाहून लावण्यानेही पाण्यात उडी मारली. परीसह गीता कशीबशी आपला जीव वाचवत पाण्याबाहेर आली, मात्र लावण्या पाण्यात बुडाली. याची माहिती गीताने खदाणीच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना दिली. ही माहिती मानपाडा पोलीस आणि डोंबिवली अग्निशमन दलाला कळवण्यात आली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून संध्याकाळी उशिरापर्यंत शोधकार्य चालू होते. सोमवारी पुन्हा शोधकार्य चालू करणार असल्याची माहिती अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी रवी गोवारी यांनी दिली.