मुंबई : प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केलेल्या पीडितेने २४ आठवड्यांनंतर गर्भपात करण्यासाठी परवानगी मिळावी, याकरिता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पोटात वाढत असलेले भ्रूण ‘अॅबनॉर्मल’ असल्याचा दावा पीडितेने केला आहे. या दाव्यात कितपत तथ्य आहे, यासाठी या पीडितेच्या शनिवारी केईएम रुग्णालयात आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीडितेचे सर्व वैद्यकीय अहवाल सोमवारी सादर करण्यात येणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी संबंधित पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश केईएम रुग्णालयाला दिले. तसेच पीडितेचे अहवाल सोमवारीच सादर करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयाला दिले. त्यानुसार, पीडितेने शनिवारी सकाळी १० वाजता कूपर रुग्णालयाचे डॉक्टर व चारकोप पोलिसांबरोबर केईएम रुग्णालय गाठले.केईएमच्या अधिष्ठातांनी पीडितेच्या तपासणीसाठी डॉक्टरांची एक समिती स्थापन केली. या समितीतल्या डॉक्टरांनी शनिवारी तिची संपूर्ण तपासणी केली. तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्याचबरोबर सर्जिकल, गायनॉलॉजिकल, मेडिकल, सायकोलॉजिकल तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. हा अहवाल सीलबंद करण्यात आला असून, सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येईल, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. पीडितेने केलेल्या याचिकेनुसार, तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. मात्र त्याने लग्नाचे आश्वासन दिल्याने तिने याविरुद्ध कोणाकडे तक्रार केली नाही. मात्र आता त्याने लग्नाला नकार दिला. याविरुद्ध तिने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. यादरम्यान, ती गरोदर असल्याचे समजले. गर्भधारणा होऊन २० आठवडे उलटल्यानंतर तिला भ्रूण ‘अॅबनॉर्मल’ असल्याचे समजले. मात्र कायद्यानुसार २० आठवडे उलटल्यानंतर गर्भपात करण्याची मुभा नसल्याने सर्व रुग्णालयांनी तिचा गर्भपात करण्यास मनाई केली. त्यामुळे पीडितेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.तिने या याचिकेत थेट ‘दि मेडिकल टर्मिनेशन आॅफ प्रेग्नेन्सी अॅक्ट, १९७१’मधील कलम ३(२)(बी)लाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. (प्रतिनिधी)भ्रूण अॅबनॉर्मल असल्याचा दावा- पीडित तरूणी मुंबईची असल्याने तिला अशा अवस्थेत दिल्लीत वैद्यकीय तपासणीसाठी येणे शक्य नसल्याने पीडितेच्या वकिलांनी तिची चाचणी केईएम रुग्णालयात करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली. न्यायालयानेही त्यांची विनंती मान्य केली. - पीडितेने केलेल्या याचिकेनुसार, तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला. गर्भधारणा होऊन २० आठवडे उलटल्यानंतर तिला भ्रूण ‘अॅबनॉर्मल’ असल्याचे समजले.
केईएममध्ये ‘त्या’ मुलीची झाली तपासणी
By admin | Published: July 24, 2016 3:29 AM