वडिलांच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलीने सोडले घर

By मनीषा म्हात्रे | Published: January 18, 2018 05:10 AM2018-01-18T05:10:59+5:302018-01-18T05:11:08+5:30

कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. म्हणून वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ३ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मुलीचा शोध घेत तिला पोलीस ठाण्यात आणले.

Girl left home due to sexual assault of father | वडिलांच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलीने सोडले घर

वडिलांच्या लैंगिक अत्याचारामुळे मुलीने सोडले घर

googlenewsNext

मुंबई : कॉलेजसाठी घराबाहेर पडलेली मुलगी परतलीच नाही. म्हणून वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ३ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मुलीचा शोध घेत तिला पोलीस ठाण्यात आणले. याबाबत कुटुंबीयांना कळविले. मात्र, आईवडिलांना बोलावू नका म्हणत मुलीने हंबरडा फोडला आणि वडिलांच्याच लैंगिक अत्याचारामुळे तिने घर सोडल्याची धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. गेल्या पाच वर्षांपासून वडिलांच्याच विकृत वासनेची ती शिकार ठरली होती. तिच्यासह बहिणीवरही हे अत्याचार सुरू होते. यालाच कंटाळून तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी ती घराबाहेर पडल्याचे पोलिसांना सांगितले.

पार्क साईट परिसरात १७ वर्षांची नेहा (नावात बदल) आईवडील, दोन लहान भावंडांसोबत राहते. दोन बहिणींचे लग्न झाले असल्याने त्या सासरी असतात. विक्रोळीच्याच एका नाइट कॉलेजमध्ये ती अकरावीचे शिक्षण घेते. अभ्यासात हुशार. दिवसभर घरातले काम उरकून ती शिक्षण पूर्ण करत होती.

२०१३मध्ये घरात एकटी असताना वडिलांचीच वाईट नजर तिच्यावर पडली. घरात कोणीही नसताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिच्यासह बहिणीलाही टार्गेट केले. दोघींवर तो लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. मारझोड करून नराधम पित्याचे त्यांच्यावर अत्याचार सुरू होते.

नेहा आणि तिच्या बहिणीने याबाबत आईलाही सांगितले. मात्र, वडिलांच्या भीतीने तिही गप्प होती. जन्मदात्या आईनेही माघार घेतल्यामुळे अत्याचार सहन करण्याशिवाय दोघींना पर्याय नव्हता. वडिलांविरुद्ध पुरावे नाहीत. त्यामुळे पोलीसही आपले म्हणणे ऐकून घेणार नाहीत, या विचारात तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रवासाबाबत कळत नसल्याने तिने मित्राला फोन केला आणि याच माहितीच्या आधारे तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलीस तिच्यापर्यंत पोहोचले.

..म्हणून सापडली ‘नेहा’
शुक्रवारी नेहा नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी घराबाहेर पडली. रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. वडिलांनी याबाबत विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिसिंग पथकाच्या पीएसआय संपदा पाटील आणि वैष्णवी कोळंबकर यांच्यावर तिचा शोध घेण्याची जबाबदारी सोपवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. सुरुवातीला तिचे नातेवाईक, मित्र मंडळीकडे चौकशी सुरू केली. प्रत्येकाच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

सोलापूरमधील पीसीओवरून नेहाने तिच्या मित्राला फोन केला. या फोनबाबत समजताच पाटील आणि कोळंबकरने मित्रामार्फत नेहापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मित्राने नेहाला मुंबईत येण्यास सांगितले. मात्र, नेहाचा नकार कायम होता. सोलापूरहून ती एशियाडने निघाली. तेथून तिने सहप्रवासीच्या मोबाइलवरून मित्राला फोन केला आणि तेथून पुढे कसे जायचे याबाबत विचारले. तपास पथक सांगत होते तसे मित्र तिला मार्ग दाखवत होता. पोलिसांनी याबाबत सहप्रवाशालाही सूचित केले आणि मुलीवर लक्ष ठेवण्यास सांगितले.

नेहाने तेथून सुरतला जाण्याचे ठरविले होते. प्रवासातच २ दिवस गेले. अखेर पाटील आणि कोळंबकर यांनी तिची समजूत काढत तिला कल्याण स्थानकात उतरण्यास सांगितले. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर सोमवारी रात्री ती कल्याण स्थानकात उतरली. तपास पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे नेहा सुखरूप पोलिसांच्या हाती लागली. तिला पोलीस ठाण्यात आणले. ती सापडल्याचे आईवडिलांना कळवत असताना तिने आई-बाबांनानका बोलवू, म्हणत हंबरडा फोडला. त्यांच्याचमुळे घर सोडल्याचे तिने पोलिसांना सांगितले अन् या वास्तवाला वाचा फुटली.

Web Title: Girl left home due to sexual assault of father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.