Join us

'या' अभिनेत्यासोबत लग्न करण्यासाठी डेहरादूनहून पळून तिनं गाठली मुंबई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2018 10:24 AM

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करण्यासाठी तिनं घरातून काढला पळ आणि...

मुंबई - दबंग अभिनेता सलमान खानच्या लग्नाचा विषय बॉलिवूडसहीत देशासाठीही चर्चेचा विषय बनला आहे. वयाच्या 52व्या वर्षीही सिंगल असलेला सलमान मिंगल कधी होणार, हा प्रश्नच आहे. तर दुसरीकडे, सलमानसोबत लग्न करण्याची इच्छा असलेल्या तरुणींची यादी तशी मोठीच आहे. अशातच सलमान खानसोबत लग्न करण्यासाठी एक तरुणी डेहरादून येथून पळून मुंबईमध्ये पोहोचली होती. कुसुम सिंह (वय 24 वर्ष) असे या तरुणीचे नाव आहे. मात्र, सलमान खानसोबत लग्न तर सोडा, त्याची साधी भेट घेणेदेखील कुसुमच्या नशिबी नव्हतं. कारण वाईट अवस्थेत आढळलेल्या कुसुमला शिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईमध्ये येण्याचे कारण कुसुमला विचारण्यात आले तेव्हा तिनं सलमान खानसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

शिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेहरादून येथील रहिवासी असलेल्या कुसुम सिंहनं 11 ऑगस्टला आपल्या घरातून धूम ठोकत मुंबई गाठली. सलमान खानसोबत लग्न करण्यासाठी ती थेट मुंबईत पोहोचली. कुसुमला सलमानच्या घराचा पत्ता माहिती माहिती नव्हता. मात्र शोधाशोध केल्यानंतर ती सलमानच्या घराबाहेर पोहोचली. यावेळी सुरक्षारक्षकांनी तिला घरात शिरण्यापासून रोखले आणि मग मुंबईच्या रस्त्यांवर ती भटकू लागली.

यापूर्वीही घरातून अनेकदा केलंय पलायन  पोलीस उपनिरीक्षक नारायण तारकुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम मानसिक रुग्ण असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. तिच्यावर औषधोपचार सुरू आहेत. यापूर्वीही तिनं घरातून अनेकदा पलायन केले आहे. केवळ नशिब चांगले असल्यानं स्थानिक पोलिसांच्या मदतीनं ती सुखरुप घरी परतलीय. 

वाईट अवस्थेत भटकत होती कुसुम 24 ऑगस्टच्या दिवशी ईस्टर्न फ्री-वेवर एकटी आणि वाईट अवस्थेत कुसुम भटकत होती. अस्ताव्यस्त असताना शिवडी पोलीस स्टेशनमधील महिला पोलीस अधिकाऱ्यानं तिला पाहिले. विचारपूस केली असता तिच्याकडून योग्य अशी उत्तरं मिळू शकली नाहीत. यामुळे तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत होत्या.

मोबाइल क्रमांकामुळे नातेवाईकांचा शोध  आठवडाभर चौकशी केल्यानंतर अखेरीस पोलिसांना कुसुमकडून काही संपर्क क्रमांक मिळाले. मात्र काही मोबाइल क्रमांक चुकीचे होते. यातील एक क्रमांक ट्रेस करण्यात आला, जो तिच्या वडिलांचा होता. पोलिसांनी तातडीनं तिच्या वडिलांसोबत संपर्क साधत त्यांना मुंबईत बोलावून घेतले व कुसुमला त्यांच्याकडे सुपूर्द केले.  

टॅग्स :सलमान खानबॉलिवूड