‘त्या’ चिमुरडीचा लिंग पुनर्रचना शस्त्रक्रिया प्रक्रियेचा पहिला टप्पा यशस्वी; हार्मोन थेरपीला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 11:37 PM2018-09-07T23:37:55+5:302018-09-07T23:38:11+5:30
सेंट जॉर्जमध्ये बीडमधील पाच वर्षांच्या चिमुरडीवर लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेचा (जनायटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी) पहिला टप्पा शुक्रवारी यशस्वीरीत्या पार पडला.
मुंबई : सेंट जॉर्जमध्ये बीडमधील पाच वर्षांच्या चिमुरडीवर लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेचा (जनायटल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी) पहिला टप्पा शुक्रवारी यशस्वीरीत्या पार पडला. या शस्त्रक्रियेत तिच्या लिंगाशेजारील उजव्या बाजूच्या अंडकोषाची (टेस्टीकल्स) पुनर्रचना करण्यात आली. आता त्या चिमुरडीवर हार्मोन्स थेरपी सुरू केल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी दिली.
ललिता साळवे हिच्या लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर रेश्माच्या (नावात बदल) कुटुंबाने सेंट जॉर्ज रुग्णालयाशी संपर्क साधून वैद्यकीय चाचण्यांनंतर लिंग पुनर्रचना शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. प्लॅस्टिक सर्जरी विभागाचे डॉ. रजत कपूर म्हणाले, शस्त्रक्रियेदरम्यान तिला पूर्णपणे भूल दिली होती. ४ शाखांतील डॉक्टरांचे विशेष पथकही तेथे होते. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तीन महिन्यांनी दुसरी शस्त्रक्रिया करण्यात येईल.
या मुलीच्या शरीरात लिंगाजवळ आधीच पुरुष टेस्टीकल्स होते. मात्र त्याची पूर्ण वाढ झाली नव्हती. त्या संबंधीच्या रचनेबाबत ही शस्त्रक्रिया होती. लिंग पुनर्रचनेनंतर तिचे लिंग पुरुषांप्रमाणे वाढेल, त्यानंतर ती पुरुषांप्रमाणे मूत्र विसर्जन करू शकेल. मात्र याला लिंगबदल म्हणता येणार नाही. हार्मोन थेरपीविषयी ते म्हणाले, हार्मोन थेरपी संप्रेरक अथवा हार्मोन हे शरीरात तयार होणारे व नैसर्गिक प्रक्रियेत आवश्यक असणारे अंत:स्राव असतात. अनेक ग्रंथींतून विविध संप्रेरक रसायने निर्माण होतात आणि त्यांच्याद्वारे तहान-भूक अशा साध्या गोष्टींपासून नैसर्गिक वाढीपर्यंत कठीण व्यवहारांचे नियमन केले जाते.