मुलगी फेकली कचऱ्यात

By admin | Published: December 11, 2015 01:44 AM2015-12-11T01:44:26+5:302015-12-11T01:44:26+5:30

मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी अनेक योजना सरकार पातळीवर राबवल्या जातात. सामाजिक संघटनाही अनेक उपक्रम राबवतात.

The girl threw in the trash | मुलगी फेकली कचऱ्यात

मुलगी फेकली कचऱ्यात

Next

मनीषा म्हात्रे,  मुंबई
मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी अनेक योजना सरकार पातळीवर राबवल्या जातात. सामाजिक संघटनाही अनेक उपक्रम राबवतात. तरीदेखील पुरुषसत्ताक मानसिकतेत अजूनही बदल झालेला दिसत नाही. पहिल्या मुलीपाठोपाठ पुन्हा मुलगी झाल्याने शिक्षणाचा खर्च, लग्नासाठीचा हुंडा या सगळ्याच्या ‘काळजी’ने जन्मदात्यानेच तिला कचराकुंडीत फेकल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली. गेल्या ५ नोव्हेंबर रोजी मुलुंडच्या अपना बाजार परिसरातील कचराकुंडीत सापडलेल्या या तान्ह्या बाळाच्या कुटुंबीयांचा पोलीस शोध घेत होते. अखेर महिनाभरानंतर पोलीस या चिमुरडीच्या घरापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
मूळचे ओडिशा येथील रहिवासी असलेले जे. साहू हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसोबत मुलुंड पश्चिमेकडील इंदिरा नगर २ मध्ये राहत होता. त्याच परिसरातील एका इंडस्ट्रीत तो कामाला आहे. घरात वंशाचा दिवा हवा म्हणून साहू आधीच पहिली मुलगी झाल्याने निराश होता. अशात दुसऱ्यांदा गर्भवती राहिलेल्या पत्नीला मुलगा होईल, अशी त्याला आशा होती. सोनोग्राफीतही बाळ स्त्रीलिंगी असल्याचे त्याला समजले. त्यानंतर त्याने पत्नीकडे गर्भपात करण्यासाठी तगादा लावला. तथापि, पत्नी ऐकत नसल्याने त्याने तिला शेवटपर्यंत रुग्णालयातही जाऊ दिले नाही. मुलीचा जन्म होताच, तिला सोडून देण्याचा निर्णय त्याने आधीच घेतला होता. अखेर एका रात्री घरीच बाळाचा जन्म झाला. दुसऱ्या मुलीच्या शिक्षणासह लग्नासाठी हुंडा द्यावा लागेल, या चिंतेने साहूने ‘ती’ सहा दिवसांची असताना ५ नोव्हेंबर रोजी तिला अपना बाजार बस स्थानकाजवळील कचराकुंडीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून समोर आली.
ही चिमुरडी कचरा वेचणाऱ्या महिलांच्या हाती लागली. त्यांनी तत्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेले मुलुंड पोलीसही या चिमुकलीला पाहून हळहळले. कुठलाही पुरावा हाती नसताना अवघ्या सहा दिवसांच्या या चिमुरडीला आई-वडिलांपर्यंत पोहोचविणे पोलिसांसमोर आव्हान होते. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजाराम व्हनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वाघमारे, गुंडा पथकाचे अंमलदार शांताराम घाडीगावकर, राकेश गजभिये, सुधाकर चव्हाण, नितीन पाटील, अरुण वाडीले आणि लुकमान सय्यद या पथकाने शोध सुरू केला. दिवसरात्र एक करत या पथकाने मुलुंड परिसर पिंजून काढला होता. इमारत, चाळ, झोपडपट्टीतील प्रत्येक घराचे दरवाजे ठोठवत असताना, बुधवारी रात्रीच्या सुमारास गुप्त माहितीदारांच्या मार्फत तपास पथकाने साहू कुटुंबीयांच्या घरी छापा टाकला. साहू दाम्पत्याच्या नातेवाइकांकडे केलेल्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आली. पोलिसांनी अखेर साहू पती-पत्नीला अटक केली आहे.

Web Title: The girl threw in the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.