भावाला घरात न घेतल्याने मुलीला पट्ट्याने बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:35+5:302021-09-21T04:06:35+5:30
वडिलांना अटक, चुनाभट्टी येथील घटना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अंथरुणात लघवी केल्यामुळे आईच्या भीतीने घर सोडून गेलेल्या भावाला ...
वडिलांना अटक, चुनाभट्टी येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंथरुणात लघवी केल्यामुळे आईच्या भीतीने घर सोडून गेलेल्या भावाला घरात घेण्यास विसरल्याने वडिलांनी १५ वर्षीय मुलीला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून चुनाभट्टी पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. महेंद्र शिवाजी इतापेला (वय ४७) असे त्याचे नाव आहे.
लाल डोंगर परिसरात १५ वर्षीय मुलगी आई-वडील आणि भावासोबत राहते. शनिवारी सकाळी लहान भावाने झोपेत अंथरुणात लघवी केल्यामुळे आई रागावेल, या भीतीने तो घरातून पळून गेला. आई-वडील आजीला घेऊन केईएम रुग्णालयात निघाल्याने त्यांनी भाऊ आल्यास त्याला घरात घेण्यास सांगितले. यादरम्यान, पिण्याचे पाणी आल्याने पाणी भरून घरातील साफसफाई करून ती अभ्यासाला बसली. त्यामुळे ती लहान भावाला घरात घेण्यास विसरली.
आई-वडील व आजी घरी आल्यानंतर मुलगा नग्न अवस्थेत फिरत असल्याने शेजारचे त्यांच्यावर रागवले. याच रागात वडिलांनी मुलीला चामड्याच्या पट्ट्याने बेदम मारहाण करून जमिनीवर दोनदा आपटले. त्यावेळी आईनेही तिला ढकलून दिले. या अमानुष मारहाणीनंतर मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवत महेंद्र याला अटक केली आहे.